- बाळासाहेब जाधव, लातूरदुष्काळामुळे होरपळणाऱ्या मराठवाड्यातील लातुरात दोन शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनीत उभ्या केलेल्या प्रकल्पांतून सौरशेतीचा आदर्श घालून दिला आहे. या दोन शेतकऱ्यांच्या ९२ एकर शेतीत महिन्याला साधारणपणे सव्वा कोटी रुपयांच्या विजेचे उत्पन्न घेतले जात आहे.उद्योजक शेतकरी राजेश्वर बुके यांनी औसा तालुक्यातील गोंद्री येथील आपल्या ४० एकर खडकाळ जमिनीवर ५.६४ मेगावॅटचा सौरप्रकल्प उभा केला. या प्रकल्पाची गुंतवणूक ३७ कोटींच्या घरात गेली. गवताचे कुसळही न येणाऱ्या या जमिनीला यामुळे सोन्याचेच दिवस आले. वर्षभर १५ कर्मचारी मोजक्या तांत्रिक कामांसह सौरऊर्जेच्या प्लेटवरील फक्त धूळ झटकायला होते. प्रकल्पातून दिवसाला २७ हजार युनिट इतक्या विजेची निर्मिती होते़ कंपनीचा केंद्र सरकारशी २० वर्षांचा खरेदीकरार आहे.दुसरे शेतकरी गणपतराव मोरगे यांनी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे ५२ एकरवर १० मेगावॅटचा सौरऊर्जेवरील प्रकल्प उभा केला. त्यांच्या या प्रकल्पातून दिवसाला ४५ हजार युनिटची वीजनिर्मिती होते. या प्रकल्पाला ६२ कोटी रुपये खर्च आला. या प्रकल्पात ७ रुपये ४५ पैसे दराने वीज विकली जाते. यापोटी दर महिन्याला तब्बल ६८ लाख रुपये उत्पन्न मिळते.सौरऊर्जेत मराठवाडा हब बनेल !मराठवाडा हा डोंगरी भाग आहे. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ओसाड आणि डोंगराळ शेती आहे. पडीक जमिनीचे क्षेत्रही इतर विभागांच्या तुलनेने मोठे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याचा प्रकाश जास्त असल्याने तापमानही सौरऊर्जेला पोषक आहे. असे प्रकल्प उभारल्यास मराठवाडा सौरऊर्जेच्या बाबतीत हब होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला़ केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशनच्या योजनेतून या दोन्ही शेतकऱ्यांना टेंडर मिळाल्याने त्यांची वीज केंद्र सरकार खरेदी करते. दररोजचे उत्पादन ते महावितरणला देतात, अशी माहिती लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता बी़ ए़ वासनिक यांनी दिली़
पडीक जमिनीवर उभारला सौरऊर्जा प्रकल्प
By admin | Published: February 22, 2016 2:17 AM