- रियाज सय्यद, संगमनेर (अहमदनगर)
आदिवासी, अतिदुर्गम, डोंगराळ, खडकाळ माळरानावरच्या शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लोकसहभागातून साकारलेल्या सौर अभ्यासिकेत आदिवासी विद्यार्थी संगणक व डिजिटल ज्ञानदानाचे धडे गिरवू लागले आहेत. १०० टक्के भारनियमनमुक्त झालेल्या या शाळेने आदर्श निर्माण केला आहे.शिरसगाव (ता. संगमनेर) प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकणारे सर्व ३७ विद्यार्थी आदिवासी आहेत. ग्रामीण भागात सततचे भारनियमन, वादळ, पावसाळ्यात नेहमी वीज खंडित होणे, यामुळे शाळा संगणकीकृत, डिजिटल असूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. शाळेतील मोलामहागाची संगणकीकृत व डिजिटल उपकरणे धूळखात पडू लागल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी त्यांचा उपयोग व्हावा, यासाठी शिरसगाव शाळेने ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सौरऊर्जा निर्मितीचा अभिनव प्रयोग केला. त्यासाठी मुख्याध्यापक सुनील वाडेकर व शिक्षक अरुण कासार यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा केला.आता या शाळेत सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ७५० वॅट वीजनिर्मिती होऊ लागली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, म्हणून सहा संगणकांद्वारे ‘एन-कॉम्प्युटिंग’ प्रणाली जोडून विद्यार्थ्यांना संगणकाचा बेसीक, तर एका संगणकावर सॉफ्टवेअरद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. कुठलेही भारनियमन नाही, वीज बिल नाही, पूर्ण दाबाने मिळणारी वीज कोणत्याही उपकरणास हानिकारक नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या ‘सौर शाळा - सौर अभ्यासिका’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिरसगाव शाळा भारनियमनमुक्त होऊन अन्य शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे. (प्रतिनिधी)