सांगली : प्रस्थापित राजकारण्यांच्या पर्यावरणविरोधी, समाजविरोधी धोरणांना विरोध करताना, प्रबोधनाला चळवळीचे बळ देऊन गेल्या अनेक वर्षांपासून एक लढवय्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करीत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला वादळाचे स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धनासह, पर्यावरणाइतकेच स्वच्छ राजकारण आणि समाजकारण अस्तित्वात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी वाटचाल करणाऱ्या या लढवय्याचे नाव आहे डॉ. विश्वंभर चौधरी. ‘लोकमत’ सांगली आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विश्वंभर चौधरी सोमवारी सांगलीत येत आहेत. ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.केवळ प्रबोधन करून परिवर्तनाचे स्वप्न साकारता येत नसल्याने, एक मोठी चळवळ उभारून सातत्याने त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांची ओळख देशभर आहे. पर्यावरणासह भारतीय राजकारणाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्याची हातोटीही त्यांच्याकडे असल्याने, राजकीय विश्लेषक म्हणून जनमानसात त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. परभणी जिल्ह्यातील वालूर हे त्यांचे मूळ गाव. १८ जून १९७१ रोजी जन्मलेल्या विश्वंभर चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सेलू (जि. परभणी) येथे झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी ‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ या विषयावर पीएच.डी. केली. पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून त्यासंदर्भातील चळवळ उभी केली. पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रबोधन आणि चळवळीची सांगड घातली. संरक्षित वनक्षेत्र व वनराई हटवून त्याठिकाणी प्रस्तावित केलेल्या लवासा सिटीसारख्या प्रकल्पास आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विरोध दर्शविला. न्यायालयीन लढाईतसुद्धा ते उतरले. पर्यावरण संरक्षणाच्या विषयावर विपुल लेखन करतानाच चळवळही उभारली. त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एन्व्हायरमेंटल क्लब आॅफ इंडिया यांच्यावतीने त्यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे. तेथेच त्यांनी पर्यावरणविषयक सल्ला संस्था सुरू केली. मेधा पाटकरप्रणित ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ या संघटनेत सात वर्षांपासून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सापळी धरण संघर्ष, लवासाविरोधी आंदोलनातही ते सहभागी झाले. पाणी परिषद, सिंचन, भू-संपादन कायदा, लोकपाल आदी विषयांवरील महाराष्ट्रातील अनेक परिसंवादात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व अन्य २२ संघटनांनी पुकारलेल्या ‘लोकपाल’ आंदोलनात ते सक्रिय झाले होते. राजकारण, समाजकारण, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, विविध मतवाद, राष्ट्रवाद आदी विषयांवर त्यांनी चिंतन आणि तटस्थपणे लेखन केले आहे. (प्रतिनिधी)लढ्याचा वारसाचौधरी यांचे वडील हनुमंतराव चौधरी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते. लढ्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. लढ्याचे स्वरूप वेगळे असले तरी, विश्वंभर चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात परिवर्तनाचा लढा सुरू ठेवला आहे. लोकांचे प्रबोधन, लोकचळवळ, लेखन अशा विविध माध्यमातून त्यांचा लढा सुरू आहे.
प्रबोधनाला चळवळीचं बळ देणारा लढवय्या
By admin | Published: February 15, 2015 11:18 PM