राजेश शेगोकार, अकोलागेल्या लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकामध्ये केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार स्थापित झाले अन् अकोल्यातील विकासाची ओरड थांबली. विकासाच्या योजना गतिमान झाल्या, नवनवीन कामांना सुरुवात झाली. अकोला शहराची हद्द वाढून तब्बल २४ गावे शहरात समाविष्ट झाली. त्यामुळे आता महापालिकेत एकहाती सत्ता दिली, तर सध्या सुरू असलेल्या विकासाला आणखी गती मिळेल, हा विश्वास खुद्द मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात येऊन दिला. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानेही निवडणुकीत झोकून दिले. परिणामी, अकोलेकरांनी भाजपाच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. भाजपाने अतिशय आक्रमकपणे रणनीती आखली. खासदार संजय धोत्रे यांनी निवडणुकीची सारी सूत्रे हाती घेत; युती होणार नाही, हे गृहित धरूनच मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांना आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांनी समर्थ साथ देत संपूर्ण अकोला शहर पिंजून काढले. उमेदवारांची निवड, त्यांचा प्रचार यासाठी खासदार व आमदारद्वयांनी स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे मेहनत घेतल्यामुळे या विजयाचा पाया रचला गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेने त्यावर कळस चढला. मावळत्या महापालिकेतही भाजपाची सेनेचा टेकू घेऊन सत्ता होती. विकासाचे हे चक्र कायम राहिले पाहिजे म्हणून अकोलेकरांनी भाजपाला ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता प्रदान केली आहे. दुसरीकडे खासदार संजय धोत्रे यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली. ८० जागांसाठी तब्बल ४०० इच्छुक असतानाही कुठेही बंडखोरी झाली नाही, क्रॉस व्होटिंग नकोच, पॅनल चालवा हा धरलेला आग्रह असो, की उमेदवरांची निवड असो आ. शर्मा व आ.सावरकर यांच्या मदतीने जनतेला विकासाचा विश्वास दिल्याने सर्व पक्ष चारीमुंडया चित झाले. एकीकडे भाजपाचा अश्व विजयी घोडदौड कायम ठेवत असतानाच त्यांचा मित्र असलेल्या शिवसेनेने स्वबळावर लढत गेल्यावेळच्या जागा कायम ठेवण्यात कसबसे यश मिळविले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख खा.अरविंद सावंत व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सेनेसाठी चांगली वातावरण निर्मिती केली होती; मात्र मतदारांना आपल्याकडे वळविण्यात सेनेला अपयश झाले.
अकोल्यात एकहाती सत्ता; विरोधकांचे दावे फोल
By admin | Published: February 25, 2017 1:00 AM