जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आता विविध संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मराठा संघटनेचा मशाल मोर्चा येणार आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये, सरकारचं धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचं मरण झालं आहे. मातोश्रीवर आक्रोश मोर्चा, मशाल मोर्चा आहे, आम्ही लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चा काढून जगाला आदर्श दिला असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी ते पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून पुण्यामध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.
सध्या कोरोनामुळे या संसर्गजन्य रोगाच्या संकटाचं सावट आहे यामुळे पंढरपुरात गर्दी होऊ नये. नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडू नये. यासाठी मराठा समाजाचा मोर्चा गर्दी करु नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच अधिकची सुरक्षा म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात केली होती. साडे अकराच्या सुमारास मराठा बांधवांना शासनाचा आदेश जुगारून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मोर्चास सुरुवात केली.