मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याची विनंती नगरपरिषद महासंघाने केली आहे. महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विनंती करण्याचा निर्णय राज्यातील नगराध्यक्षांच्या परिषदेत घेण्यात आला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक आणि परिषदेचे तज्ज्ञ सल्लागार रणजित चव्हाण यांनी अंधेरी (पश्चिम) येथील संस्थेच्या सभागृहात परिषदेचे आयोजन केले होते.दीपप्रज्वलनाद्वारे महासंघाचे अध्यक्ष आणि खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी संस्थेचे महासंचालक रणजित चव्हाण, महासंघाचे सरचिटणीस आणि आंबेजोगईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संस्थेचे मानद संचालक लक्ष्मणराव लटके, तज्ज्ञ सल्लागार अद्वैत औधकर यांच्यासह राज्यातील अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष उपस्थित होते.नगरपालिकांना भेडसावणार्या अनेक समस्यांचा यावेळी ऊहापोह करण्यात आला. त्यात नगरसेवकांचा भत्ता, मानधन वाढावे, नगरपरिषदांना आर्थिक मंजुरी मर्यादेत वाढ करावी, महासंघाच्या बैठकांना उपस्थित राहणार्या नगराध्यक्षांना प्रवासभत्ता मिळावा, महिला व बालकल्याण सभापती व महिला सदस्यांना वाढीव सभा भत्ता मिळावा, जिल्हा नियोजन विकास समितीत २५ टक्के निधी नागरी क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात यावा, मंत्रालयात कामासाठी येणार्या नगराध्यक्षांना प्रवेशासाठी विशेष पास उपलब्ध करून द्यावा, नगरपरिषदांवर असणारा महसूल खात्याचा अंकुश काढण्यात यावा, शासनाच्या यूडी-६ या योजनेतून विविध नगरपरिषदांना १०० टक्के अनुदान मिळावे, या विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा झाली.