पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील लष्कराच्या हद्दीत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या जागांच्या हस्तांतरण, बोपखेल गावासाठी मुठा नदीवर रस्ता उभारणे आणि रेड झोन हद्द कमी करावी, या मागणीसाठी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावर ‘सर्व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात येत्या ३१ मे रोजी पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. पिंपरी, डेअरी फार्म येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे एक पिलर लष्कराच्या हद्दीत उभारण्यासाठी तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आश्वासनही संरक्षणमंत्र्यांनी दिले. संरक्षणमंत्री पुण्यात आले असताना आमदार जगताप यांनी भेट घेतली. भाजपाचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते. याविषयी आमदार जगताप म्हणाले, ‘‘औंध-रावेत हा बीआरटीएस रस्ता लष्करी हद्दीतून जातो. या रस्त्यांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी लष्कराच्या संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. पिंपरीतील डेअरी फार्मजवळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग लष्कराच्या हद्दीतून जातो. त्यासाठी महापालिकेने दोन कोटी ८७ लाख रुपये लष्कराकडे जमा केले आहेत. उड्डाणपुलाच्या सुधारित रचनेला तातडीने मंजुरी दिल्यास उड्डाणपुलाचे काम महापालिकेला सुरू करता येईल. पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक चौकापर्यंत चार रस्ता गाव नकाशात समाविष्ट आहे. परंतु, लष्कराने तो बंद केला आहे. दापोडीतील सीएमईमधून बोपखेलकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे बोपखेलसाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा. (प्रतिनिधी)>आळंदी रस्ता ते बोपखेल येथील गणेशनगर हा दहा मीटरचा रस्ता करण्यासाठी रक्कम जमा करूनही त्याला परवानगी दिलेली नाही. पिंपळे सौदागर येथील १८ मीटर रुंद रस्त्याच्या जागेपोटी महापालिकेने आधीच पावणे दोन कोटी रुपये लष्कराकडे जमा केले आहेत. उर्वरित जागेपोटीही महापालिका रक्कम अदा केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला तातडीने परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना साकडे
By admin | Published: May 16, 2016 1:44 AM