ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने आता रणशिंग फुंकले असून शहरातील विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजपाचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी ठाण्यात दिले. तसेच ‘ठाणे इन राज्यसभा’ हे फेसबुक पेजही ते सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात ठाण्यातून कोकण रेल्वेच्या धर्तीवर रो-रो वाहतूक, जलवाहतूक सुरू करणे,या प्रस्तावांचा समावेश आहे.महिन्यातून एकदा ठाणेकरांना भेटणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे भाजपा नेतृत्वहीन असल्यामुळे पक्षाने सहस्रबुद्धेंना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरवले आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील वाहतूक, प्रदूषण, रोजगार संधी तसेच अन्य विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या तुलनेत ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, पनवेल आणि आसपासच्या शहरांतील लोकसंख्या जवळपास मुंबईइतकीच आहे. परंतु, या शहरांतील प्रश्न हे मुंबईपेक्षा वेगळे असून त्याचा प्राधान्याने तसेच गांभीर्याने विचार होत नाही. त्यामुळे या भागातील समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडून जास्तीतजास्त अर्थसाहाय्य मिळावे तसेच या शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यसभेतील सदस्य म्हणून ठाण्यातील नागिरकांशी संपर्क साधणे सोपे जावे, यासाठी ‘ठाणे इन राज्यसभा’ या नावाने फेसबुक पेज सुरू होणार आहे. तर, महिन्यातून पहिल्या शनिवारी भाजपा कार्यालयात ठाणेकरांना भेटणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सामाजिक कार्यकर्ते सुजय पतकी हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहणार आहेत. ठामपाची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून त्या पार्श्वभूमीवर भाजपाने ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (प्रतिनिधी)जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे ठाण्यातून होणाऱ्या ट्रक वाहतुकीचा भार कमी व्हावा, म्हणून वसई ते पनवेल, उरण आणि वसई ते पुणे या मार्गावर कोकण रेल्वेप्रमाणे रो-रो पद्धतीची वाहतूक सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करणार असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यातील विविध शहरांना जोडण्यासाठी जलवाहतुकीचा प्रस्ताव लवकर मार्गी लागावा, म्हणूनही प्रयत्न करणार आहे. तसेच प्रस्तावित कोपरी रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेला असून त्यासही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील प्रश्न सोडवणार - सहस्रबुद्धे
By admin | Published: July 19, 2016 3:15 AM