'भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात, योग्यवेळी हातोडा मारू', नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:05 AM2024-02-18T10:05:21+5:302024-02-18T10:05:45+5:30
Nana Patole News: फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उभी फूट पाडल्यानंतर भाजपाने नुकताच काँग्रेसला धक्का दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना आपल्या गोटात ओढत भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपासोबत जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
लोणावळा येथे झालेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे काही विद्यमान आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. जेव्हा आम्ही हातोडा मारू तेव्हा तुम्हाला ते दिसेलच. मात्र आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब नाही आहे. आमच्यासाठी सध्या ज्या प्रकारे महाराष्ट्र पेटवण्याचं पाप भारत जलाओ पार्टीने केलं आहे. या भारत जलाओ पार्टीला महाराष्ट्र पेटवण्याचा काय अधिकार आहे. त्यामुळे भाजपाचे जे विद्यमान आमदार, खासदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असतील त्यांच्याबाबत वेळेनुसार निर्णय घेऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये संबोधित करताना नाना पटोले म्हणाले होते की, लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या, असा दावाही नाना पटोले यांनी केला.