मुंबई – अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांशी फारकत घेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत या नेत्यांनी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. अजित पवारांच्या या भूमिकेने राष्ट्रवादीत २ गट पडले. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष आपल्यासमोरही उभा राहू शकतो त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी आणि विकासकामांसाठी सत्तेत सहभागी होण्याचे वेध शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना लागले आहे.
राष्ट्रवादीत अजित पवारांना मानणारे आमदार त्यांच्यासोबत सत्तेत गेले. मात्र काही आमदार शरद पवारांसोबत कायम राहिले. आता या आमदारांमध्येही २ मतप्रवाह तयार झाल्याची माहिती आहे. सत्तेत राहून लोकांची कामे करता येतील आणि पक्षही मजबूत करता येईल असं मत काही आमदारांनी मांडले आहे. या आमदारांकडून शरद पवारांना सत्तेत सहभागी होण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी नेत्यांनीही शरद पवारांची वाय.बी सेंटरला जात एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली. या भेटीतही पवारांनी आपल्यासोबत यावे. पक्ष मजबूत ठेवावा, पक्षात फूट पडू नये अशी विनवणी केली होती. त्यानंतर आता शरद पवारांसोबत असलेले आमदारही सत्तेत जाण्याचं मत मांडू लागले आहेत असं वृत्त एबीपी वृत्तवाहिनेने दिले आहे.
शरद पवारांची समजूत घालून त्यांना सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न अजित पवारांसह इतर नेत्यांचा आहे. तर पवारांसोबत असलेले आमदार आपण या नेत्यांसोबत गेले पाहिजेत. विकासासाठी सत्तेत सहभागी व्हायला हवं असं त्यांना वाटते. भविष्यात सत्तेत राहून लोकांची कामे करता येईल असा आग्रह आमदारांचा आहे. दुसरीकडे वयाचा विचार न करता शरद पवारांनी मैदानात उतरून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले आहेत. परंतु आता पक्ष वाढवणे इतके सोपे नाही. त्यासाठी शरद पवारांच्या तब्येतीनेही साथ देणे गरजेचे आहे.
रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यासारखे नेते शरद पवारांसोबत आहेत. मात्र अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी नेते नसल्याने राज्यात पक्ष संघटनेला उभारी देण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण पुन्हा सगळे एकत्र आले पाहिजे. पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहिला पाहिजे असं या आमदारांना वाटते. परंतु जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारखे आमदार शरद पवारांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे अशी भूमिका मांडत आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.