मुंबई, दि. 16 - काँग्रेसमधून कुणी बाहेर पडल्यास नव्यांना संधी मिळेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिली. त्यांचा रोख काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे होता. मागच्या काही महिन्यांपासून नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले.
काही लोक दलबदलू असतात, सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे उद्या कोणी गेले तर, नव्यांना संधी मिळेल असे अशोक चव्हाण म्हणाले. भाजपाबद्दल बोलताना भाजपा देशातील सर्वात मोठा खरेदी-विक्री संघ असल्याची टीका त्यांनी केला. कोणाची किती उपयुक्तता आहे हे न तपासता भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी ये-जा सुरु असते असे चव्हाण म्हणाले.
आणखी वाचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू 'त्या' प्रवाशाला बोरीवली-अंधेरी फर्स्ट क्लासचा पास पडला 1.3 लाख रुपयांना
मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत तीन दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता या दोघांचाही राजीनाम मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. यामागे सरकार असुरक्षित होईल, ही भिती दिसून येते. सुभाष देसाई यांचा राजीनामा स्वीकारल्यास शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असेही त्यांना वाटले असावे. पण एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि मेहता- देसाई यांना एक न्याय हे यातून दिसून येते.
लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचा अधिकार नाही. प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नस्तीवर सही केल्याचे म्हटले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले.
पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करावी व त्वरित उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यांनी सांगितले की, पावसाची खूप गरज आहे. जायकवाडीतही जेमतेम पाणी आले आहे. तीन महिन्यांपासून पावसाने ओढच दिली आहे. त्यामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. सरकारने वेळीच उपाययोजना सुरु करण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.