काही लोक चुका करतही असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:43 PM2021-01-22T13:43:14+5:302021-01-22T14:35:32+5:30
ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण?
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय पक्षात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात शुक्रवारी मोठी घडामोड घडली असून आरोप करणाऱ्या महिलेने कौटुंबिक कारण देत मुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांपासून ते अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीवर निशाणा साधणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता त्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील मुंडे प्रकरणावरून विरोधकांना चांगेलच धारेवर धरले आहे. तसेच 'सिरम'मध्ये सकाळपासून तपासणी सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते शोधलं जाईल. काहीच लपवले जाणार नाही असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यात अजित पवार याच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण? धनंजय मुंडे यांना आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले. पण त्यावेळी आम्ही या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. मात्र अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? मान्य आहे की काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात. पण असं काही जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले.
काहीजण वारे बदलते तसे बदलतात...
पुण्यातील 19 नगरसेवक संपर्कात आहेत. काही जण वारे बदलते तसे बदलतात किंवा त्यांची काही विकास काम करून घ्यायची असतील पण बेरजेचे राजकारण करायचं असतं, इलेक्टिव्ह मेरिट बघायचा असतो.
आम्हाला जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ
सध्या लसीकरणाबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 / 30 टक्के च लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन ॲपची समस्या आहे, अशी कारणे आहे. खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ असेही ते यावेळी म्हणाले.