संजय राऊतांचा अजित पवारांना मोलाचा सल्ला; म्हणाले, "राजकारणात एकमेकांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:36 PM2023-04-19T21:36:44+5:302023-04-19T21:37:30+5:30
अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. त्यांनी थेट नाव घेतले पाहिजे होते असं राऊत म्हणाले.
मुंबई - अजित पवार आणि संजय राऊत संघर्ष असण्याचं कारण नाही. राजकारणात एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. आघाडीत होतात, तीन पक्ष वेगळे आहेत. प्रत्येक नेत्याची बोलण्याची, वागण्याची, विचार करण्याची क्षमता आणि पद्धत वेगळी आहे. अजितदादांचा, माझा, उद्धव ठाकरेंचा, शरद पवारांचा वेगळा स्वभाव असेल. काही गोष्टी खिलाडू वृत्तीने घ्यायच्या असतात असा मोलाचा सल्ला संजय राऊतांनीअजित पवारांना दिला.
...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर
संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. त्यांनी थेट नाव घेतले पाहिजे होते. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे. महाविकास आघाडी तुटू नये ही माझ्यावर जबाबदारी आहे. शिवसेना फुटताना आमची बाजू शरद पवार, अजित पवारांनी मांडली होती. मग आम्ही बोललो का तुम्ही का बोलताय? राजकारणात एकमेकांना विश्वास द्यायचा असतो. आम्ही संकटात असताना पवार कुटुंब आमच्या पाठिशी उभे राहिले. शिवसेना कशी फोडली हे सांगत होते असं त्यांनी सांगितले.
ही नियतीची इच्छा
अजित पवारांशी माझा संघर्ष कशासाठी होईल? त्यांच्या राजकारणाशी माझा संबंध नाही. महाराष्ट्रातील आपतधर्म म्हणून आम्ही एकत्र आहोत. ज्या शक्तीविरोधात लढतोय त्याच्यासाठी तिघांनी एकत्रित येऊन लढावे ही नियतीची इच्छा आहे. पवार कुटुंबाचे माझे व्यक्तिगत संबंध वर्षानुवर्षे आहेत. काही रुसवेफुगवे होत असतात. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नाहीत हे मी बोललो, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक फोडण्याचा डाव भाजपा करतेय. ब्लॅकमेल करतेय. आम्ही कायम अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करतो. ते लोकप्रिय नेते आहेत. संघर्षाचा संबंध येतो कुठे? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
वेगळा निर्णय घेतला पाहिजे ही NCP आमदारांची भूमिका
आमच्या काही लोकांवर दबाव आहे. परंतु पक्ष भाजपासोबत जाऊ शकत नाही. हे शक्य नाही. काहींना प्रचंड त्रास होतोय, कुटुंबाला मनस्ताप होतोय, मुलं, सूना, नातवंडांना त्रास होतोय, त्यांना वारंवार चौकशीला बोलावले जातेय. लोकांचे मानसिक खच्चीकरण होतेय. त्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. आपण एक निर्णय घेतला पाहिजे आणि हा त्रास थांबवला पाहिजे. पक्ष म्हणून निर्णय घेऊया असं सहकाऱ्यांनी पवारांना सांगितले. त्यावर आपण एकत्र लढूया, २०२४ नंतर हा त्रास संपेल असं पवारांनी सहकाऱ्यांना म्हटलं, त्याचसोबत तरी या त्रासाचा कडेलोट होत असेल तर, कुटुंब भरडली जात असतील त्यातून तुम्ही काय निर्णय घेणार असाल तर हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे. पक्ष तुमच्या निर्णयात सहभागी नसेल अशी भूमिका पक्षप्रमुख पवारांनी घेतली त्याचे स्वागत आहे असं विधान संजय राऊतांनी उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीतील तपशीलावर केले.
राहुल गांधी-उद्धव ठाकरेंमध्ये होईल भेट
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट व्हावी यावर केसी वेणुगोपाल यांच्या बैठकीत एकमत आहे. पुढील काळात राहुल गांधी मुंबई, महाराष्ट्रात आले तर नक्कीच उद्धव ठाकरेंसोबत भेट होईल. उद्धव ठाकरेंना दिल्लीचे फार आकर्षण आहे. जे बाळासाहेब ठाकरेंनाही कधी नव्हते असं राऊतांनी म्हटलं.