आत्मचिंतन करा : गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी अन् फितुरी भोवली कमलेश वानखेडे - नागपूरएकेकाळी नागपुरात काँग्रेसचा दबदबा होता. पक्षाच्या स्टेजवर कार्यकर्ते मावत नव्हते. एखादा मेळावा असला, निवडणूक असली की खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन शेकडो कार्यकर्ते बाहेर पडायचे. कारण, आपली अडचण पक्ष सोडवेल याची कार्यकर्त्याला खात्री होती. पण अलीकडे काँग्रेसची संस्कृतीच बदलली. मंत्र्यांनी कधी जनता दरबार घेतले नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पक्ष संघटना वाढीसाठी पाठबळ दिले नाही. नेत्यांनी कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस केली नाही. नेत्यांनी लाल दिव्यातून फिरायचे अन् कार्यकर्त्यांनी चपलाच झिजवायच्या, असे कुठवर चालणार. कार्यकर्त्याला बळ मिळाले नाही तर तो कुठवर धावणार, याचा नेत्यांनी वेळीच विचार केला नाही. त्यामुळे कार्यकर्ता बसला आणि पर्यायानं पक्षही बसला.विधानसभा निवडणूक काँग्रेस लढली की उमेदवार, पक्ष संघटना लढली की नेत्यांचे कार्यकर्ते? निवडणुकीत पक्ष कुठे दिसला का ? असे एक ना अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्तिगत स्तरावर मते घेतली आहेत. पूर्ण निवडणुकीत पक्ष त्यांच्यासोबत नव्हताच. पक्षाचे संघटन फक्त मंचावर बसण्यापुरते होते. प्रचारात काँग्रेसमध्ये कुठलेही समन्वय दिसले नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत: पश्चिम नागपुरातून निवडणूक लढत होते. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद हे देखील रिंंगणात होते. नागपुरातील काँग्रेस सहा भागात विभागल्या गेली होती. सर्व मतदारसंघांच्या प्रचाराची धुरा एकहाती ठेवून काँग्रेसचा रथ पुढे दामटताना कुणी दिसले नाही. आजी- माजी खासदारांनी पुढाकार घेऊन एखाद्या अनुभवी नेत्यावर जबाबदारी सोपवून देवडियात निवडणुकीसाठी ‘वॉर रूम’ तयार करायला हवी होती. पण देवडियात सारे काही गार होते. पूर्ण निवडणूक काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नागपुरात फक्त एक दिवस प्रचारासाठी आले. त्यांनी पूर्व नागपूर व पारशिवनी येथे जाहीर सभा घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शहरात दाखल होईपर्यंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना याची साधी माहितीदेखील नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे निरोप जाहिरात एजन्सीकडून गेले. कुणाचा पायपोस कुणात नव्हता.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची रामटेक येथे सभा असताना नागपुरातून दिल्लीत स्थिरावलेले नेते येथे सक्रिय दिसले. पण राहुल गांधी परतल्यावर या नेत्यांनी पाहिजे तशी निवडणूक अंगावर घेतली नाही. काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्यस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्राचे सहप्रभारी बाला बच्चन, रिता बहुगुणा यांच्यासह राजबब्बर व नगमा आल्या. पण त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही.
कुणी बुडविली काँग्रेस ?
By admin | Published: October 21, 2014 12:59 AM