- कुलदीप घायवट
मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याची ने-आण करण्यासाठी एसटी कर्मचारी तत्पर आहे. मात्र हि सेवा देताना एसटी कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. मुंबई विभागासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागेल. अनेक कर्मचारी आता रुग्णांलयात, कोरोना विलीगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. मात्र त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणतीही विचारपूस केली जात नाही. औषध व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नसल्याची व्यथा एसटी कर्मचार्यांनी मांडली.
एसटी महामंडळाकडून कोरोना बाधित एसटी कर्मचाऱ्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिले आहे. कोरोना विषाणू बाधित एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना मानसिक आधार द्यावा. विभाग नियंत्रक, कामगार अधिकारी, संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी वैयक्तिक लक्ष देऊन बाधित कर्मचाऱ्यांची त्याच्या कुटुंबियांची वारंवार चौकशी करून धीर द्यावा. कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून, वैद्यकीय सल्ल्यानुसार विलगीकरण करणे आवश्यक असल्यास त्यांचे तत्काळ विलगीकरण कारण्याबाबत आरोग्य विभाग / स्थानिक प्रशासनास कळविण्यात यावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यभरातील आगारांना दिल्या होत्या. मात्र अधिकारी वर्ग विचारपूस करत नाही. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बोलविण्यात येत होते. मात्र आता कोरोना झाल्यामुळे कोणी फोन करत नाही. फक्त मोजक्यांनीच विचारपूस केली आहे. विचारपूस करून मानसिक आधार द्यावा, मनोबल वाढवावे, एवढीच इच्छा आहे, अशी व्यथा एसटी कर्मचारी मांडत आहेत.
आगार पातळीवर एसटीमधील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची साधी चौकशी केली जात नाही. जे उपचार घेत आहेत, त्यांना रुग्णालयातील अडचणीना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जात नाही. औषधे व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नाही.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस
१६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु; ६५ कर्मचारी बरे
राज्यभरात ८ जुलैपर्यंत एकूण २३९ कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. मात्र यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. तर, १६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. ६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत.