देशात चर्चेचा ठरलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील वायकर-किर्तीकर वाद काही थांबायचे नाव घेत नाहीय. रविंद्र वायकर यांचा ज्या पद्धतीने विजय घोषित करण्यात आला त्यावरून ठाकरे गट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. अशावेळी शिंदे गटात असलेले गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाचा उमेदवार असलेल्या अमोल किर्तीकर यांना व ठाकरे गटाला एक सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप केले आहेत.
निकालावर चर्चा करत बसू नका, थेट हायकोर्टात जा, तुमच्या मनात जो काही संशय आहे त्यावर जो काही निर्णय येईल तो मान्य करा, असा सल्ला किर्तीकर यांनी दिला आहे. तसेच भ्रष्ट अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी का केली होती, असा सवाल करत भ्रष्टाचाराचे आधीच आरोप असताना अशा अधिकाऱ्याची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक का केली याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असे किर्तीकर म्हणाले.
मी असलेल्या पक्षाचा उमेदवार जिंकला. मी वायकरांचा प्रचार केला नाही, परंतू अमोलचाही केला नाही. मी दोघांपैकी ज्याचा प्रचार केला असता तो ४८ नाही तर ५० हजारांच्या फरकाने जिंकून आला असता. मी मुलाचा प्रचार तरी कसा करणार होतो, म्हणून स्तब्ध राहिलो, कोणाचाही प्रचार केला नाही, असे किर्तीकर यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या जागा आधीच जाहीर झाल्या असत्या तर आणखी ४-५ जागा सहज आल्या असत्या या रामदास कदमांच्या मताशी आपण सहमत असल्याचेही किर्तीकर म्हणाले. याचबरोबर त्यांनी शिशीर शिंदे यांनाही प्रत्यूत्तर दिले. ते आधी शिवसेनेसोबत गेले, मग मनसे मग आता शिंदेंसोबत आले आहेत. ते मला काय निष्ठा शिकविणार असा बोचरा सवाल किर्तीकर यांनी केला आहे.