ऑनलाइन लोकमतयवतमाळ : वडगाव रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापमनवाडीतील साडेसात लाखांच्या चोरीचा मास्टरमार्इंड मुलगाच असल्याचे पुढे आले आहे. मुलाने शेजारच्या एका मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ११.३० घरातील ३५ तोळे सोने आणि ४० हजार रोख रक्कम चोरीस गेली होती.
पांडुरंग चंपतराव वाघमारे (५९) रा. चापमनवाडी गुरुदेव मंदिर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुममध्ये ठेवलेल्या लॉकरमधून ३५ तोळे सोने आणि रोख ४० हजार रुपये चोरीला गेले. वाघमारे कुटुंबातील सर्व पुरुष ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या खानगाव येथील कॉन्व्हेंटवर गेले असताना ही घटना घडली. यावेळी महिला आणि लहान मुले घरातच होती. घटनाच संशयास्पद असल्याने पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला. टोळी विरोधी पथकाने सर्वप्रथम शेजारी राहत असलेल्या साईराज सुधीर बोबडे (१९) याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. यात तक्रारकर्ते पांडुरंग वाघमारे यांचा लहान मुलगा रोहित पांडुरंग वाघमारे (२३) हाच मुख्यसूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.
रोहित वाघमारे याच्या सांगण्यावरून साईराजने चोरी केली. त्यानंतर दोन दिवसांनी चोरीतील रोख व दागिने रोहितला दिले. या मोबदल्यात रोहितने साईराजला एक नेकलेस, तीन अंगठ्या आणि पाच हजार रोख दिले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर रोहितच्या खोलीतून दागिने व रोख जप्त केली. रोहितला सावत्र आई आणि मोठा भाऊ आहे. यातूनच त्याने घरातच चोरी करण्याचा डाव रचल्याचे पोलिसांपुढे कबूल केले. चोरी गेलेले सोने आणि रोख ३४ हजार पोलिसांनी हस्तगत केली. या गुन्ह्याचा तपास टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, गजानन धात्रक, संजय दुबे, विनोद राठोड, किरण पडघन, नीरज तांबे, रुपाली मेने यांनी केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली