भरत उबाळे, शहापूरअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आधुनिक काळात जीवनमान उंचावण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. शहरात वीज नसेल तर पानही हलू शकत नाही. मात्र, ठाणे जिल्ह्णातील शहापूर तालुक्यात वसलेल्या अवघ्या ३५ घरांच्या सोनशेत या वस्तीला गेली ४० वर्षे वीज नाही, हे भीषण वास्तव आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी वसलेल्या गावात आजतागायत विजेची साधी तारही पोहोचलेली नाही. संध्याकाळ झाल्यावर येथे रॉकेलच्या चिमण्या पेटतात अथवा चुलीच्या उजेडावर घरातला कारभार चालतो. गावकऱ्यांनी वीज मिळावी म्हणून महावितरणच्या सहायक अभियंत्यांना भेटण्याचे खूप वेळा प्रयत्न केले, पण गावकऱ्यांची साधी भेट घेण्याचेही शासनाच्या या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौजन्य दाखवले नाही. वीजजोडणीबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबाबत मनसेचे तालुकाप्रमुख जयवंत मांजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिरगाव, नेहरोली, जांभे, लेनाड, शेंद्रूण या गावांना जोडलेले सोनशेत हे आदिवासी वस्तीचे ३५ घरांचे सुमारे १२० लोकसंख्येचे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. महसुली गावांना सर्व शासन सुविधा उपलब्ध करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोनशेतमध्ये आजतागायत साधी वीजही पोहोचली नसल्याने हे गाव अंधाराचे गाव ठरले आहे. सोनशेत गावासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची तरतूद मंजूर झाली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदिवासी वस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मधुकर वाघ, रमेश हिलम या ग्रामस्थांनी केला आहे.
शहापुरातील सोनशेत गाव चाळीस वर्षे अंधारात
By admin | Published: April 23, 2015 5:27 AM