सुधीर कुलकर्णी/नाशिक, दि. 5 - ट्रॅफिक असो किंवा नसो पण तरिही उगाचच हॉर्न वाजवणा-यांची संख्या काही कमी नाही. यातून ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा मनुष्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आणि शहरातील काही सामाजिक संघटना, शाळा, कॉलेज एकत्र आले असून, प्रत्येक सोमवारी ‘नो हॉन डे’ साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एप्रिल महिन्यापासून आठवड्यातून एकदा 'नो हॉर्न डे' साजरा करुन उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील एक महिलेनं काही चिमुकलींसहीत मिळून सोशल मीडियावर ‘नो हॉन डे’ या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या गाजत असलेल्या सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का?, या गाण्याचा आधार घेत स्वतः गाणं रचलं आहे. ''सोनू तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय?''अशा आशयाचे गाणं प्रीती पारख यांनी तयार केले आहे. या गाण्याद्वारे त्यांनी चालकांनी नियंत्रण ठेवले तर हॉर्न वाजवण्याची गरज भासणार नाही परंतू वाहतुकीच्या समस्या कमी होऊ शकतील, हा मुद्दाही त्यांनी मांडला आहे. प्रीती पारख यांच्या या व्हिडीओमध्ये बबिता प्रसाद, फोरम बसानी, आर्या भोसले, अपूर्वा मेढी, शांभवी ठाकूर, साक्षी वराडे, शैलजा ब्राम्हणकर यांच्यासह अन्य मुलांनी सहभाग नोंदवलाय.