शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:35 PM2024-05-27T12:35:38+5:302024-05-27T12:36:42+5:30
loksabha Election - देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पवारांचे राष्ट्रीय पातळीवरील २ युवा शिलेदार पक्षाला रामराम करत अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे २ युवा शिलेदार अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक अजित पवारांच्या नेतृत्वात होत आहे. या बैठकीला शरद पवार गटाच्या युवक आणि युवती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या बैठकीला हे दोघेही दाखल झाल्याची माहिती आहे.
या बैठकीला उपस्थित धीरज शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हा निर्णय अचानक झाला नाही. अनेकदा अशी परिस्थिती तयार होते, त्यातून भावनात्मक निर्णय घ्यावा लागतो. गेल्या १८ वर्षापासून मी पक्षासोबत काम करतोय. प्रत्येक चढउतारात पक्षाचं काम करतोय. परंतु देशात मी प्रत्येक ठिकाणी असं वातावरण बघतोय. त्यात देशाच्या विकासासाठी जे व्हिजन आहे त्यात युवकांचा विश्वास मोदींसोबत आहे. जर देशातील कोट्यवधी लोक विकासावर एका व्यक्तीवर विश्वास ठेवत असेल तर नकारात्मक राजकारणातून सकारात्मक राजकारणाकडे जाण्यासाठी मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलं.
तसेच पक्षाने महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्याचा विचार सोडून दिला आहे. त्यात राज्यातील लोक अजित पवारांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे युवकांचे भवितव्य अजित पवारांच्या नेतृत्वात चांगले होऊ शकते असं मला वाटतं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे मुद्दे उचलले त्यासाठी तोडगा निघत असेल तर सारखं विरोधी आहोत म्हणून विरोधातच राजकारण करणं मला पटत नाही. देशातील लोकांचा विश्वास मोदींवर आहे. मी अनेक युवकांशी चर्चा केली. २६ राज्यात संघटनेतील युवकांशी बोललो. देशाचा भवितव्याचा विचार आपल्याला करायला हवा असं युवकांचे म्हणणं आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर आम्ही चांगले योगदान देऊ शकतो असंही धीरज शर्मा यांनी म्हटलं.
दरम्यान, सोनिया दुहन यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली आहे. मात्र दुहन यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. परंतु त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोनिया दुहन यांनी प्रोफाईल बदलून एकप्रकारे पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांचा पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.