वर्धा: महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यात आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात दुपारचं भोजन घेतलं. यानंतर त्यांनी स्वत:च ताट स्वत:चं धुतलं. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनीदेखील स्वत:ची ताटं धुतली. महात्मा गांधी यांनी स्वावलंबनाची शिकवण दिली होती. ती आज काँग्रेस अध्यक्षांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आचरणात आणल्याचं पाहायला मिळालं. सेवाग्राम आश्रमातील भोजनानंतर राहुल गांधींनी काही स्थानिकांशी संवाद साधला. यानंतर राहुल गांधी एका जनसभेला संबोधित करणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. थोड्याच वेळात काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक होणार आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राममध्ये काँग्रेस पक्षाची बैठक होत असल्यानं ती अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असेल. विशेष म्हणजे तब्बल 70 वर्षांनंतर सेवाग्राम आश्रमात काँग्रेसची बैठक होत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला राहुल गांधींसह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आजाद, अशोक गहलोत, रणदीप सुरजेवाला, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. या बैठकीत वर्तमान राजकारण आणि समाजकारणावर चर्चा होईल. या बैठकीवरुन गेले काही दिवस उलटसुलट चर्चा होती. सेवाग्राम समितीनं काँग्रेसला परवानगी नाकारल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र आज दिवसभर सेवाग्राम आश्रमात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.