सोलापूर : भाजप हा पक्ष गरीबांना मोठे करण्यासाठी अन लहानातल्या लहान कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम भाजप करीत आहे़ दुसरीकडे आमच्या विरोधी पक्षातील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा आपला मुलगा, आपली मुलगी, आपले वडील, आपली आई, आपल्या बहिणीला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे काम करीत आहे. लोकशाहीला परिवारात वाटप करण्याचे काम शरद पवार व सोनिया गांधी यांनी केल्याची जोरदार टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली.
एवढेच नव्हे की राहुल गांधी व पाकिस्तान याच्या प्रत्येक गोष्टीत साम्य कसे काय असते असाही सवाल उपस्थित केला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते. अमित शहा पुढे म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळत नव्हते़ सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष पराभव स्वीकारूनच निवडणुक लढवित आहेत. पराभव होणार असल्यानेच राहुल गांधी विदेश दौºयावर गेले असल्याचेही शहा म्हणाले. राज्यात परिवारावादी लोकांमुळे देशाचा विकास खुंटला आहे़ राज्यात सर्वत्र भाजप सरकारने गोरगरीब, सर्वसामान्यातून मोठया झालेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचे शहा यांनी सांगितले.
राज्यात १५ वर्षे केलेल्या कारभारावरूनही अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला़ ज्या ज्या वेळी देशाचा विषय आला तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीने पक्ष न पाहता सहकार्याची भावना ठेवल्याचेही शहा यांनी सांगितले.