मुंबई : आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. यामध्ये मसुदा तयार करण्यात आला. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या निर्णय, बदलानंतर त्याची अंमलबजावणी आम्ही करू असे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आज पहिली समन्वय बैठक झाली. महाशिवआघाडीच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. लवकरच हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई बैठकीला हजर होते.बैठकीनंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भूमिका मांडली. राज्यातील शेतकरी संकटात आहे. यामुळे त्याच्या भल्यासाठी निती ठरविण्यात येत आहे. राज्याला पुन्हा निवडणुका नकोत. त्याचा भार जनतेवर नको म्हणून आम्ही एकत्र येत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी सरकार स्थापन करणार का आणि पवार आणि सोनिया गांधी भेटणार का, या प्रश्नावर उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की 18 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी सोनिया गांधी आणि शरद पवार भेटण्याची शक्यता आहे असे सांगितले. यामुळे येत्या 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा सरकार स्थापन होण्याच्या आशा मावळल्या आहेत. तर छगन भुजबळ यांनी या दिवशी सरकार स्थापन झाले तर चांगलेच असल्याचे म्हटले.