मुंबई, दि. 8- सोनू, तुझा मायावर भरवसा नाय का ? या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण या गाण्याच्या माध्यमातून काहीना काही विषय मांडू पाहतो आहे. आरजे मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर सोनू गाण्याच्या माध्यमातून टीका केल्यानंतर बरंच वादंग निर्माण झालं होतं. या सोनू गाण्याचा आवाज आता विधानभवनांच्या पायऱ्यांपर्यंत पोहचला आहे. या गाण्याचा आधार घेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली. घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी या गाण्यातून केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी हे आंदोलन केलं.
इगतपुरीमधील गोंदेदुमाला येथे एमआयडीसीने संपादीत केलेली ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.