ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - गायक सोनू निगमने आपल्याविरोधात काढण्यात आलेल्या फतव्याला चोख उत्तर देत स्वत: मुंडण करुन घेतलं आहे. मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला होता. सोनू निगमचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे सोनू निगमने आपला मुस्लिम मित्र हकिम आलीम याच्याकडूनच आपले केस कापून घेत सय्यद शाह आतेफ अली कादरी यांना जशास तसं उत्तर दिलं आहे.
सोनू निगमने पत्रकार परिषद घेत आपली बाजूदेखील मांडली. "ज्या व्यक्तीने आपल्या संपुर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना आपलं वडिल मानलं, ज्याच्या गुरुचं नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब आहे. त्या व्यक्तीबद्दल असा विचार करत तो मुस्लिमविरोधी आहे असं कोणी कसं काय म्हणू शकतं. असं असेल तर ही तुमची समस्या आहे, माझी नाही", असं सोनू निगम बोलला आहे.
Sonu Nigam gets his head shaved after a Fatwa was issued announcing 10 Lakhs for anyone who shaves Nigam"s head pic.twitter.com/wWUZmnmb8N— ANI (@ANI_news) April 19, 2017
गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे.
यावर सोनूनं ही धार्मिक गुंडगिरी नाही का?, असा प्रश्न विचारत स्वतः मुंडण करुन घेणार असून मौलवी मुंडण करणा-यासाठी 10 लाख रुपये देण्यासाठी तयार राहा, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
Today at 2pm Aalim will come to my place, and shave my head. Keep your 10 lakhs ready Maulavi. https://t.co/5jyCmkt3pm— Sonu Nigam (@sonunigam) April 19, 2017
दरम्यान, मंगळवारी सोनूनं पुन्हा ट्विट करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. "मस्जिद किंवा मंदिरांवर भोंगे लावण्यावर परवानगी मिळू नये, असे सोनूने नव्याने ट्विट केले. त्यामुळे पुन्हा "भोंगे" या विषयावर यावर सोशल मीडियामध्ये लाउड चर्चा सुरू झाली आहे.
If he(Maulvi) has 10 lakh rupees then he should give it to me, I will donate it to some charity: Aalim Hakim(who shaved Nigam's head) pic.twitter.com/qaqN9TzWSb— ANI (@ANI_news) April 19, 2017
सोनू निगमने नव्याने केलेल्या ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. "नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. अत्याधुनिक युगात नमाजासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही", असे परखड मत पटेल यांनी मांडले आहे.
यावर "समजूतदार व्यक्ती अशा प्रकारे मुद्दा समजून घेतात. तुमचा आदर आहे अहमद पटेल जी. अजान किंवा आरतीचा नाही तर हा मुद्दा भोंग्याचा आहे," अशी प्रतिक्रिया सोनूनं दिली.
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.