यदु जोशी मुंबई : राज्याच्या गृहविभागात मोठे फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्याअंतर्गत सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.राज्यात एकीकडे अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता असताना श्रीवास्तव यांना गृह विभागातून हलविले जाऊ शकते, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.श्रीवास्तव हे मध्यंतरी मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते. डी. के. जैन, मेधा गाडगीळ यांच्यासोबत त्यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. तथापि डी. के. जैन यांच्या नावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पसंती दिली.त्यामुळे नाराज झालेले गाडगीळ व श्रीवास्तव रजेवर गेले होते. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, श्रीवास्तव यांना पर्यावरण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठवले जाईल व सोबतच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंडळाचे अध्यक्षपद हे विज्ञानविषयक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच मंडळाचे देता येते. श्रीवास्तव यांनी केमिकल इंजिनिअरींग केले आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती उत्तम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आता श्रीवास्तव यांच्या जागी कुणाची नियुक्ती करतात, याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे नाव चर्चेत आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गृहविभागाची घडी नीट बसविण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असेल.श्रीवास्तव हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. वित्त विभागाची सूत्रे त्यांनी दीर्घकाळ यशस्वीरित्या सांभाळली आहेत. असे असले तरीही गृह विभागाचा बाज वेगळा असतो, म्हणून अन्य नावांचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गृहविभागात लवकरच मोठे फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:30 AM