लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : लहानपणी फॅन्सी ड्रेसमध्ये हौस म्हणून मुलाला पोलिसांचा ड्रेस घातला. आणि तेव्हापासून त्या दोघांनी एकच स्वप्न उराशी बाळगले, ते म्हणजे स्वत:च्या मुलाला पोलीस बनवण्याचे. आपल्या आई-वडिलांचे हे स्वप्न मुलगाही जाणून होता. त्याने देखील काहीही झालं तरी हे स्वप्न पूर्ण करायचेच, असं ठरवलं आणि ते प्रत्यक्षातही आणलं. मुरबाड तालुक्यातील वांजळे या गावातील संदीप ऐगडे याची ही कथा. आपल्या आईवडिलांचे स्वप्न जाणून ते पूर्ण करणाऱ्या संदीपवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.शेतकरी कुटुंबातील संदीप एमपीएससीची परिक्षा पास होऊन उपपोलीस निरीक्षक झाला आहे. ही गोष्ट त्याच्या आई - वडिलांना कळताच त्यांचा आनंद गगनात मावेना. संदीपच्या शिक्षणासाठी आई कमल आणि वडील रामचंद्र ऐगडे यांनी शेतीत कष्ट करून शिक्षणासाठी काटकसर करत त्याला शिकवले. संदीपने पोलीस अधिकारी बनावे, अशी त्यांची लहानपणापासूनच इच्छा होती. त्यामुळे २००७ मध्ये संदीप पोलीस दलात सहभागी झाला. ठाणे शहर पोलीस दलात काम करताना मोठा पोलीस अधिकारी होण्याची आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो एमपीएससीच्या तयारीला लागला. गेल्यावर्षीच्या एमपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागला. आणि त्यात उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होत संदीपने आईवडिलांचे स्वप्नही पूर्ण केले.
अखेर तो झाला पोलीस अधिकारी
By admin | Published: May 10, 2017 12:00 AM