ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी तसेच अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलासाठी महाराष्ट्रामध्ये निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्च्यांपासून प्रेरणा घेऊन दुबईमध्येही शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. दुबईमधील मराठा समाजाच्या नागरिकांनी भारतातील मराठा समाजाकडून केल्या जाणा-या मागण्यांना पाठींबा देण्यात आला. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे ही समाजाची मागणी योग्य असून शासनाने यावर गांभिर्याने विचार करावा अशी अपेक्षा या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. मराठा समाजावर होणारा अन्याय दुर्लक्षित केला जातो. त्याला वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. राज्यात सर्वत्र लाखोंच्या संख्येने समाज मोर्चांमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे विदेशातील मराठा समाजालाही स्फुरण चढले आहे. त्यामधून दुबईमधील जवळपास ७० मराठा नागरिकांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले. गेल्या दहा पंधरा वर्षांपासून दुबईमध्ये कामानिमित्त राहात असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे मोबाईल क्रमांक आणि माहिती मिळवण्यात आली. त्यांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करण्यात आला. एकमेकांच्या संपर्कात राहून सर्वांना राज्यातील मराठा मोर्चांची माहिती आणि छायाचित्रे तसेच व्हिडीओ शेअर केले जात होते. दुबईमध्ये मोर्चा किंवा रॅली काढायला बंदी आहे. त्यामुळे केवळ एकत्रिकरण करुन मराठा समाजाच्या मागण्यांंना पाठींबा देण्यासाठी दुबई प्रशासनाकडून परवानगी मागण्यात आली होती. शारजा रस्त्यावर शहरालगतच्या एका वाळवंटी भागात सर्वांचे एकत्रिकरण करण्यात आले होते.ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या संघटनेचा, आव्वाज कुणाचा, वीर मराठ्यांचा असे फलक घेऊन तरुण या मोर्च्यात सहभागी झाले होते. हा मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चाचे आयोजन रघुनाथ बापु सगळे-पाटील, विक्रम भीमराव भोसले, अभिजीत देशमुख, राजेश वाघ, सतिश शिर्के, प्रकाश पवार यांनी केले होते.