लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी न देण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. सरकारने दिलेल्या या माहितीनंतर उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर काढलेली अवमान नोटीस रद्द केली.‘शांतता क्षेत्रात’ मोडणाऱ्या माहीम पोलीस ठाण्यातच उरूसदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व साहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमान नोटीस बजावली. गेल्या सुनावणीत दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. मात्र राज्य सरकारकडून ‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक लावू न देण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने न्यायालयाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची माफी स्वीकारली नाही. गुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी राज्य सरकारने ‘शांतता क्षेत्रात ’ ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी न देण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिला असल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाला दिली. तसेच मे महिन्यात यासंबंधी काढलेली अधिसूचनाही न्यायालयापुढे सादर केली.‘आम्ही ही अधिसूचना हमी म्हणून रेकॉर्डवर घेत आहोत,’ असे न्यायालयाने स्पष्ट करत माहीमच्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर बजावलेली अवमान नोटीस रद्द केली.
ध्वनिक्षेपकास ‘शांतता क्षेत्रा’त परवानगी नाही
By admin | Published: June 23, 2017 3:50 AM