खदान पोलीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका डॉक्टरकडे आया म्हणून काम करीत असलेल्या महिलेला गर्भपाताच्या किट्सची खरेदी-विक्री करताना अटक केल्यानंतर या महिलेने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने परभणीतील एका मेडिकलवर छापा टाकून गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला आहे. सदर मेडिकलच्या संचालकास अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.अकोला येथे दोन दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या अवैध औषध साठ्याचे धागेदोरे परभणी जिल्ह्यातील मानवतपर्यंत असल्याचे खदान पोलीस आणि अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले आहे. खदान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मेहरुन्नीसा नामक आयाने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांचे एक पथक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रविवारी परभणी जिल्ह्यात गेले. या महिलेचे कनेक्शन असलेल्या परभणीतील मानवतमधील ‘ढमढेरे मेडिकल’मधून गर्भपाताच्या औषधांची अवैधरीत्या विक्री करण्यात येत होती. सदर महिलेला गर्भपाताच्या किट्स खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून ‘ढमढेरे मेडिकल’मध्ये पाठविण्यात आले. ढमढेरे मेडिकलच्या संचालकाने गर्भपाताच्या किट्सचे खरेदीचे देयक नसताना सदर औषधाची १००० रु. स्वीकारून विनादेयकाने तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत विक्री केली. यावरून खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अमृत निखाडे, अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक बळीराम मरेवाड, खदान पोलीस स्टेशनचे भारसाकळे आणि पथकाने छापा टाक ला. मेडिकल संचालकास रंगेहात अटक केली. महिला व मेडिकल संचालकाविरुद्ध परभणीत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अकोल्यात आणले असून, त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मेडिकलची औषध विक्री थांबविलीपोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करताच, ढमढेरे मेडिकलची औषध विक्री तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.खदान पोलिसांनी औषध प्रशासनाच्या मदतीने परभणीत ही कारवाई केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. यामध्ये अनेकांचा समावेश असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.-गजानन शेळके, ठाणेदार खदान.