मुंबई : शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, अशी मागणी रिपाइने केली आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) पाच तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंसाठी दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत राहू, मात्र शिवसेना आणि भाजपाने त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाइंसाठी सोडावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात युतीतील जागावाटपाची घोषणा झाली. या जागावाटपानुसार शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढविणार आहे. युतीच्या या जागावाटपावर रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, असा प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रिपाइंने दोन जागांची मागणी केली असताना रासपने भाजपा-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. येत्या ५ मार्चला रासपने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत या मेळाव्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे रासपने स्पष्ट केले.एनडीएतच राहण्याचा निर्णययुतीचा निर्णय घेताना विश्वासात घेण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश गेला आहे. नाराजी असली तरी स्वबळावर अथवा तिसºया, चौथ्या आघाडीच्या पर्यायांचा विचार न करता एनडीएत राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.