ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 10 - नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे, मान्सून दक्षिण अंदमानाच्या समुद्रात आणि निकोबार बेटाच्या परिसरात येत्या 15 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या देशभरात उन्हाच्या तीव्र झळा असताना हवामान विभागाने ही आनंदाची बातमी दिली आहे, गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने तो 96 टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन 20 मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर 25 मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. त्यानंतर 1 जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़ त्यात काही वेळा पुढे मागे होत आला आहे. आताची पोषक स्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण 5 दिवस मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याचे दिसून येत आहे. त्याची पुढील वाटचाल कशी असेल यावर तो केरळला आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल, हे समजून येणार आहे. सध्या तरी सर्वांसाठी मान्सूनचे आगमन होत असल्याची चांगली खूशखबर आहे. पुढील वाटचाल महत्त्वाचीआपल्याकडे अंदमान बेटानजीक 15 ते 20 मेच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होत असते. त्यात 4- 5 दिवसांचा फरक असतो, हे लक्षात घेता त्याला उशीर न होता, तो वेळेवर येत असल्याचे संकेत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील 10 ते 15 दिवसांत त्याची वाटचाल कशी होते आणि त्याचे केरळला कधी आगमन होते, याकडे आता आपले लक्ष राहील. केरळला मान्सूनचे आगमन कधी होईल, याचा अंदाज व्यक्त करताना 15 मेपर्यंतची स्थिती कशी आहे, हे लक्षात घेतली जाते. सध्या तरी मान्सून वेळेवर येत असल्याचे आपल्यासाठी महत्वाचे आहे.डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमानात होणार दाखल
By admin | Published: May 10, 2017 7:56 PM