योगेश गुंड, अहमदनगर ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या घटनेची मंगळवारी शतकपूर्ती होत आहे.३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ऐवजी ‘होमरूल’ (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी ३१ मे १९१६ रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली. नगरमधील सभेचा उत्साह पाहून टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. त्यामुळे सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली. १०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वसाहतीच्या प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत.