लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अपेक्षित वाटचालीअभावी काही भागात पिकांच्या पेरणीचे वेळापत्रक कोलमडले आहे. दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात १ ते २३ जूनपर्यंत सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. मात्र सर्व भागात सारखा पाऊस नसल्याने आतापर्यंत राज्यात १८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी पावसाची गरज आहे. नागपूर विभागात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ४. २ टक्के तर त्यानंतर पुणे विभागात पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात तुलनेने चांगली स्थिती असून औरंगाबाद विभागात ४५ टक्के तर लातूर विभागात सुमारे १५ टक्के पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागातही १४ टक्के पेरा झाला आहे. नाशिक विभागातही पेरणीला वेग आलेला नसून तेथे १६ टक्केच पेरणी झाली आहे. अमरावती विभागात २२ टक्के पेरणी झाली आहे. खरीप हंगामात कापूस व सोयाबीन ही मुख्ये पिके आहेत. सोयाबीनची २० टक्के तर कापसाची ३० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप कडधान्यामध्ये तूर १५, मुग १४, उडीद ११ तर इतर कडधान्याची २ टक्के पेरणी झाली आहे. एकूण खरीप कडधान्यांचा विचार करता १३ टक्के पेरा झाला आहे.उगवण समाधानकारक : राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळता) १३९.६४ लाख हेक्टर असून २३ जून अखेर २५.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर (१८%) पेरणी झाली. खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून कोकण व कोल्हापूर विभागात भात पिकाची धुळवाफ पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे.मराठवाडा, विदर्भात पेरा कमीपुणे विभागात सोलापूर जिल्हा (१%), पुणे जिल्हा (४ %) तर अहमदनगर जिल्ह्यात (६.३ %) अपेक्षित पेरणी झालेली नाही. लातूर विभागात उस्मानाबाद (४ %), नांदेड (८ %), परभणी (० %) येथे समाधानकारक पेरणी झालेली नाही. अकोला (४%), अमरावती (५%), नागपूर (४%), भंडारा (०%), गोंदिया (० %) येथे पेरणीला वेग आलेला नाही.
राज्यभरात १८ टक्के क्षेत्रावर पेरणी
By admin | Published: June 28, 2017 1:56 AM