उस्मानाबाद : माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तडवळा ता.जि. उस्मानाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरीत करण्यात आला.
उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ८१,७७३ शेतकरी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मुळे खरीप २०१७ मधील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते. सदरील चुका जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,कृषी आयुक्त यांच्यासह कृषी, महसूल,मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करत पीक नुकसानी पोटी विमा भरपाई देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
याबाबत विविध आंदोलने देखील करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये झालेल्या चुका मान्य करत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मदत काही मिळत नव्हती. मुख्यमंत्री सकारात्मक असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे शासन स्तरावर होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागावी लागली होती. मा. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची मागणी ग्राह्य धरत दोन महिन्याच्या आत पीक विमा वितरित करण्याचे आदेशीत केले.
त्यानुसार शासनाने उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्या पासून वंचित राहिलेल्या ८१७७३ शेतकऱ्यांना रु २९. ९४ कोटी पीक विम्यापोटी वितरित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.
राणाजगजितसिंह पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विमा रक्कम वितरित करण्यात आली. तडवळा शाखेअंतर्गत येणाऱ्या तडवळा,गोपाळवाडी, दुधगाव, कोंबडवाडी,खामगाव या गावातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विम्याची रक्कम वाटप करण्यात आली.
शासनाने सुरुवातील रु.५६.६१कोटी मंजुरीचा आदेश निर्गमीत केला होता. परंतु यात सुधारणा करत ही रक्कम रु.२९.९४ कोटी करण्यात आली. कपात केलेली रक्कम मिळणेबाबत न्यायालयात बाजु मांडण्यात आली असुन याबाबत दि.२३/०९/२०१९ रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी लढा सुरुच ठेवण्याचे आश्वासन यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, सरचिटणीस सतिश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सतिश दंड नाईक, भारत डोलारे, त्र्यंबक कचरे, नाना वाघ, पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर, नगरसेवक बालाजी कोरे,शशांक सस्ते, भारत लोंढे, बँकेचे शाखा अधिकारी आर. एस घुटे व सर्व कर्मचारी यांच्यासह बहुसंख्याने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.