कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. या माध्यमातून सुमारे ६५ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, शेतकरी महाराष्ट्राचे खरे ब्रांड एम्बेसिडर आहेत. त्यामुळे यापुढे दरवर्षी त्यांचा कौतुक सोहळा होईल. पुरोगामी महाराष्ट्राला शोभेल अशा पद्धतीने पुरस्कार रक्कम चौपट वाढवली आहे. पाऊस जास्त झाल्याने होणारे नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान उद्याच हस्तांतरित करण्यात येईल. त्यामध्ये ६५ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा योजनेत अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कांदा निर्यात बंदी बाबत सुद्धा मदत केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढचे बिल शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील, असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासित केले.
यावेळी शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल पुढे म्हणाले की, देशातील १४० कोटी लोकांना शेतकऱ्यांशिवाय भविष्य नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी शेतकरी ठामपणे उभा होता. त्यामुळे ते मोठा इतिहास रचू शकले, हा महाराष्ट्राचा महान इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याने राबवलेली १ रुपयात विमा योजना ऐतिहासिक आहे, अशा शब्दात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शासनाच्या कृषी योजनेचे कौतुक केले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना करून द्यावा त्यांनी समाजात कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे असे आवाहन केले.