अकोला : सोयाबीन पिकावर विविध किडींनी आक्रमण केले असून, ही कीड सोयाबीनच्या पानांची चाळणी करीत असल्याने शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सव्वा महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले होते. परंतु दोन दिवसातच पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने किडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात जवळपास १६ लाख हेक्टरच्यावर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे; पण लगेच पावसाने दडी मारल्याने जवळपास ७0 टक्के पीक हातचे गेले असून, शेकडो शेतकर्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला. पावसाचे पुनरागमन झाल्याने उर्वरित ३0 टक्के पिके तरतील, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि पावसाने गत आठवड्यापासून दडी मारल्याने किडींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्यातरी ही हिरवी अळी असल्याचे कृषी तज्ज्ञांमार्फत सांगितले जात असले तरी झाडांची होणारी चाळणी बघता हिरवी उंटअळी किंवा तंबाखूची पाने खाणारी ही अळी असावी, असा कयास लावला जात असल्याने शेतकरी आणखीच धास्तावला आहे. अकोला व अमरावती जिल्हय़ातील काही भागातील सोयाबीन पिवळे पडले असून, पिवळा मोझ्ॉक या रोगामुळे या भागातील सोयाबीनची पाने पिवळी झाली आहेत. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाल्याने पाने पिवळी पडतात. मात्र पानाच्या शिरा हिरव्या राहतात. पण, अकोला जिल्हय़ातील बोंदरखेड शिवारातील सोयाबीनच्या पानांची पूर्णत: चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी हिरवी उंट अळी निदर्शनात आली आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकर्यांचा कीटकनाशकांचा खर्च करावा लागणार आहे. परंतु शेतकर्यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी कीटकनाशकांवर खर्च करणे टाळत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीनवर किडींचे आक्रमण!
By admin | Published: August 03, 2015 12:19 AM