मुंबई : समाजवादी पार्टीने महाराष्ट्रात फक्त एक जागा मागितली होती. पण, काँग्रेसने त्याचीही तयारी दाखविली नाही. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही. सपा आणि बसपाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून सर्व ४८ जागा लढणार असल्याचे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात आघाडी केली. मात्र, काँग्रेसला काही जागाही सोडल्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसने सपाने मागितलेली जागा द्यायला हवी होती. मात्र काँग्रेसने तसे केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातही सपा आणि बसपाने एकत्र येण्याचा निर्णय आज जाहीर केला. या वेळी आझमी म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सपा-बसपाने एकत्र येत विजय मिळविला. आता फायनल मॅच जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. काँग्रेससोबत महाराष्ट्रात आघाडी करण्यासाठी आमचा विचार सुरू होता, मात्र काँग्रेसने दाद दिली नाही, असा आरोप त्यांनीकेला.बसपाचे खासदार अशोक सिद्धार्थ म्हणाले की, महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील जातीची समीकरणे बघून उमेदवार घोषित केले जातील.
सपा-बसपा राज्यातील सर्व ४८ जागा लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:47 AM