Akhilesh Yadav on Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत समाजवादी पक्षाचे(सपा) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोठे विधान केले आहे. सपा अध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मी शुक्रवारी महाराष्ट्रात जातोय, तिथे याबाबत चर्चा होईल.
अखिलेश यादव काय म्हणाले?सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना इंडिया आघाडी मजबुतीने एकत्र काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, 'मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. इंडिया आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमचे राज्यात दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.
सपाचा 10-12 जागांवर डोळाअखिलेश यादव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान त्यांचे मालेगाव आणि धुळे येथे कार्यक्रम होतील. दरम्यान, सपा आता यूपीबाहेरही पक्षाचा विस्तार करत आहे. सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा आहे. यामध्ये त्या जागांचा समावेश आहे, जिथे मुस्लिम आणि यूपीमधून येणारे लोक जास्त प्रमाणात राहतात. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीत सपाला 3-4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.
सपाचे राज्यात दोन आमदारसध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत. अलीकडेच अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये महाराष्ट्र युनिटच्या नेत्यांची बैठकही घेतली होती. ज्यामध्ये निवडणुकीची रणनीती तयार करण्यात आली आहे. सपा इंडिया आघाडीचा भाग बनल्यास अखिलेश यादव महाराष्ट्रातही प्रचार करताना दिसू शकतात.
अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पार्टीचा अपमान करू नये. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पार्टीला फक्त एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ 5 मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पार्टी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये. जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर समाजवादी पार्टीला इतर कोणत्याही आघाडीसोबत म्हणजेच तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा महाराष्ट्रात अनेक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यानंतर जर मुस्लिम मतांची विभागणी झाली तर त्याला समाजवादी पार्टी नव्हे, तर महाविकास आघाडी जबाबदार असेल, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.