कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस व ताराराणी आघाडीमध्ये सोमवारी कदमवाडीत राडा झाला. हे दोन्ही पक्ष मंगळवारी शांत होते; परंतु त्या राड्यावरून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली; तर त्याला पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत, आता आमच्या सहनशीलतेचा स्फोट झाला असल्याचे सांगत माझा राजीनामा मागणाऱ्या गोऱ्हे कोण? असा संतप्त सवाल केला. त्यामुळे या दोन पक्षांतील आधीच वाढलेले अंतर आणखी वाढले. शिवसेना व भाजप हे राज्यात व केंद्रात सत्तेत असले तरी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. त्यातही शिवसेना जास्त पुढे आहे. कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेला सोडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ताराराणी आघाडीशी संगत केल्याचाही शिवसेनेला राग आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने मंगळवारी त्यांच्यावरच थेट हल्ला केला. राजीनामा मागणाऱ्या गोऱ्हे कोण?चंद्रकांतदादांचा सवाल : आमच्या सहनशीलतेचा आता स्फोट झाला कोल्हापूर : शिवसेनेकडून ‘मीच शहाणा’ म्हणत सातत्याने केले जात असलेले आरोप आता अति झालेत. आमच्या सहनशीलतेचा स्फोट झाला आहे. मला पालकमंत्रिपदावरून हटवा म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हे कोण, असा संतप्त सवाल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गोऱ्हेंनी आपली काळजी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिका निवडणुकीदरम्यान सोमवारी झालेल्या हाणामारीतील दोषींवर पोलीस निष्पक्षपातीपणे कारवाई करतील. हाणामारीचा ‘इश्यू’ करून भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्या गोऱ्हे यांनी वृत्तवाहिन्यांकडे जाऊन भाजपवर व माझ्यावर टीका करण्याची गरज नव्हती. अलीकडे शिवसेनेकडून भाजपचा अपमान करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुय्यम वागणूक दिली जात आहे, टीका सहन करतो याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत, असा होत नाही. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे सेनेच्या विरोधात मीही जाहीरपणे बोलत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दृृष्टिक्षेपात आहे. शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी गोऱ्हे आमच्यावर टीका करत आहेत. निवडणुकीतील कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी माझ्याशी थेट संपर्क साधून बोलण्याचा हक्क गोऱ्हेंना आहे, असे असताना पत्रकार परिषद घेऊन मला पदावरून हटवा, असे सांगणे चुकीचे आहे. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या दोन महिन्याने संपणाऱ्या आमदारकीची काळजी करावी. मुख्यमंत्र्यांकडून दादांनाच बळ...पालकमंत्री पाटील यांच्यावर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेकडून जोरदार हल्ला सुरू असल्यानेच सायंकाळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दादांची जोरदार पाठराखण केली. दादा हे वर्षभरात अंगाला डाग लागू न शकलेले प्रामाणिक मंत्री असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले. दादांचा उल्लेख त्यांनी ‘कार्यक्षम, अतिशय सक्षम मंत्री’ असा केला व सभेत शिवसेनेची मात्र त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही.पालकमंत्री चंद्रकांतदादांना पदावरून हटवा : नीलमताई गोऱ्हेकोल्हापूर : भाजप, ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी व कॉँग्रेस, आदी राजकीय पक्षांनी महानगरपालिका निवडणुकीत गुंड, मटका बुकीमालक, खून तसेच ‘मोक्का’तील आरोपी यांना उमेदवारी दिली आहे. या टग्यांची टगेगिरी सोमवारच्या (दि. २६) घटनेनंतर मतदारांच्या लक्षात आली असून, जर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवायची असेल तर पोलिसांनी ही टगेगिरी त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या घटनेचे उत्तरदायित्व घेणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सोमवारी घडलेल्या घटनेची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? असा सवाल करतच आमदार गोऱ्हे यांनी गुंडगिरी आणि बेबंदशाहीला पाठिंबा न देता आणि भेदभावही न करता दोषी असणाऱ्या दोन्ही गटांच्या गुंडांवर कडक कारवाई करायला पोलिसांना भाग पाडावे, अशी मागणीसुद्धा केली. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून काळ्या काचा असलेली चारचाकी वाहने फिरत आहेत. मतदानाच्या दिवसापर्यंत अशा वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही वाहने कोणाची आहेत, त्यातून कोण फिरत आहेत, त्यांचे काय उपद्व्याप चालले आहेत, याची तपासणी व्हावी. पोलिसांनी तत्काळ अशा काळ्या काचा असलेल्या वाहनांना रोखून त्यांची कडक तपासणी करावी, काचांवरील काळ्या फिल्म काढून टाकाव्यात, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. शहरात वाहतूक शाखेचे पोलीस आणि आचारसंहितेचे कॅमेरे कुठेच पाहायला मिळत नाहीत; त्यामुळे भाजप, ताराराणी, राष्ट्रवादीच्या गुंडांचे फावत आहे. कारागृहातून पॅरोलवर सुटलेले काही गुंड, मवाली प्रचार व पदयात्रांतून पाहायला मिळत आहेत. तेव्हा पोलिसांनी तातडीने अशा लोकांवर कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या. पैसे वाटून आणि मतदारांवर दहशत निर्माण करून कोल्हापूरची शान वाढणार नाही; तर त्यामुळे बदनामीच अधिक होणार आहे. करवीरनगरीची कायदा व सुव्यवस्था त्यामुळे बिघडणार आहे; म्हणूनच निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी आणि सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पोलीस व निवडणूक यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कदमवाडी राड्यातील संशयित आरोपींना दोन दिवसांत अटक केली जाईल. निवडणूक प्रक्रियेमुळे बहुतांश पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहेत. संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी राड्याचे व्हिडीओ चित्रीकरण व पंचनामा सादर केला जाणार आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा,पोलीस अधीक्षक कोणाशीही सेटलमेंट नाहीमहापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमुक एका पक्षाबरोबर सेटलमेंट केली आहे, असा समज पसरविला जात आहे. शिवसेना एकटी लढत आहे. आम्ही कोणाशीही सेटलमेंट केलेली नाही. जी काही चर्चा आहे, ती केवळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिले. अशाच मागण्यांबाबत आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटून चर्चा केली.
ठिणगी शेजाऱ्यांत, स्फोट दादा-तार्इंच्यात
By admin | Published: October 28, 2015 12:15 AM