पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल पुर्वनियोजित कट असल्याचा दावा विविध संघटनांच्या सत्यशोधन समितीने केला आहे. मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी वढु बु. येथे घेतलेल्या बैठकांमुळे त्याची ठिणगी पडली. दंगलीदरम्यान मुस्लिम व बौध्द समाजातील लोकांची दुकाने, वाहने जाणीवपुर्वक लक्ष्य केली. त्यासाठी राज्याच्या इतर भागातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आल्याचा दावाही समितीने केला आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, लाल निशान पक्षाचे सचिव भिमराव बनसोड, सत्यशोधक जागर मासिकाच्या संपादक प्रा. प्रतिमा परदेशी, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले यांचा सत्यशोधन समितीत समावेश आहे. त्यांनी दि. ४ जानेवारीला वढु, सणसवाडी, कोरेगाव भीमा या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. यावेळी नोंदविलेल्या निरीक्षणांचा अहवाल शुक्रवारी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. पाटणकर म्हणाले, गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बाहेरून आलेल्यांनी ही दंगल घडवून आणल्याचे सांगितले. यामध्ये गावातील लोकांचा समावेश नाही. गावातील मुस्लिम व बौध्द समाजातील लोकांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. त्यांची घरे, दुकाने, गॅरेज, वाहनांची जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. त्याची झळ गावातील लोकांनाही बसली. यावरून विशिष्ट विचार करणा-या लोकांनीच हे घडवून आणले असून हा पुर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होते. एकबोटे व भिडे यांचे यापुर्वी या भागात दौरे झाले आहेत. त्यांनी घेतलेल्या बैठकांमधून वातावरण तयार करण्याचे काम केले. दंगलीची ठिणगी पडायला याच बैठका कारणीभुत ठरल्या. याबाबत माहिती असताना राज्य शासनाने चौकशी केली नाही. तसेच दंगलीच्या दिवशीही पोलिस वेळेवर पोहचले नाहीत.
वढु (बु.)ला जमून चाकण रस्ता, सणसवाडी, कोरगाव भीम चौक येथे भगवे झेंडे घेतलेला जमाव बाहेरून आला होता. हा जमाव चार किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर येवून दगडफेक करेपर्यंत पोलिस गप्प का बसले. सणसवाडीत ग्रामपंचायतीचा ठराव बघता व परिसरात चाललेल्या हिंदुत्व आघाडीतील सभांमधील प्रचार होऊनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कृती केली नाही. भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ पोलिसांची उपस्थितीही तुरळक तर वढु बु. ला मोठी कुमक होती. सणसवाडी येथे नुकसान झालेले सर्वजण एकतर मुस्लिम किंवा बौध्द आहेत. स्थानिक मराठा शेतकरी कुटूंबाचे कोणेतही नुकसान झालेले समोर आले नाही, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
अहवालातील प्रमुख मुद्दे -
- गाड्या जाळण्यासाठी ज्वालाग्रही पदार्थांची आधीपासूनच तयारी
- इमारतीच्या वरच्या मजल्यावर दगड जमा केले
- मुस्लिम व बौध्दांना जाणीवपुर्वक लक्ष्य
- पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह
- समाज परिवर्तन ऐक्य स्तंभ घोषित करावा
- दंगलीची विनाविलंब न्यायालयीन चौकशी करावी