सातारा : ‘कुणी कॉलर वर करतंय, कुणी विजार वर करतंय,’ या विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वक्त्यव्याची राज्यभरात खमंग चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरवर बोलण्याऐवजी रामराजेंनी पाणीप्रश्नावर बोलावे, असा टोला भाजपाचे माण-खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लगावला आहे.राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात रामराजेंनी केलेले वक्तव लक्षवेधी ठरले. नक्कल करीत केलेल्या या सूचक वक्तव्याने अचूक लक्ष्यभेद केल्याने, पवारांसह व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थितांना हसता-हसता पुरेवाट झाली. हा रामबाण ज्यांना वर्मी लागला, त्यांनी सध्या चुप्पी साधणेच पसंद केले आहे, परंतु शनिवारी डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामराजेंवर निशाणा साधला. खासदार उदयनराजेंचे भाजपमध्ये स्वागत करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच (शुक्रवारी) सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर येळगावकरांच्या या बोलण्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील आमदारांच्या निष्क्रियतेबाबत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. जिल्ह्यातील नेतेमंडळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते. मात्र, जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याची सुबुद्धी त्यांना झाली नाही. जिल्ह्यातल्या धरणांचे पाणी जिल्ह्यातील सिंचनासाठी वापरायचे, असा ठराव जिल्हा परिषदेने मागे केला होता. तो ठराव नेतेमंडळींनी हाणून पाडला. सांगलीतील विविध पक्षांचे नेते पाणीप्रश्नावर एकत्र येतात, तर ते साताऱ्यात का होत नाही? जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यातच ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, आम्ही सत्तेत असलो, तरी घाबरणार नाही, असेही येळगावकरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अभ्यास काय चुलीत घालायचाय?सातारा जिल्ह्यात धरणे असताना या धरणातील पाण्याचा लाभ जिल्हावासीयांना मिळत नाही. सांगली, सोलापूर या शेजारील जिल्ह्याचे खमके नेते आपल्या जिल्ह्यात पाणी पळवून हा हक्क हिरावून घेत आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पाणीप्रश्नावर मोठा अभ्यास आहे, असे म्हटले जाते. त्यांचा हा अभ्यास काय चुलीत घालायचाय? रामराजेंनी कुणाच्या कॉलरवर बोलण्यापेक्षा पाणीप्रश्नावर बोलावे,’ अशा शब्दात येळगावकर बरसले.
कॉलरऐवजी पाण्यावर बोलावे
By admin | Published: January 15, 2017 3:12 AM