"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:08 PM2024-08-14T19:08:50+5:302024-08-14T19:12:44+5:30

शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे.

Speaking at Shivswarajya Yatra Supriya Sule has made suggestive statement about Ajit Pawar | "मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

Supriya Sule On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या आत्मपरीक्षणातून जात आहे. अशातच त्यांनी बारामती निवडणुकीबाबत  पश्चाताप व्यक्त केला. पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवायला लावून चूक केल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीसोबत गेलेल्या अजित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. अजित पवार यांच्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता धाराशिवमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी एक सूचक विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंचे हे विधान अजित पवार यांच्यासाठीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

तुळजापूर येथे शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सभा पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. ही बहीण फक्त १५०० रुपयांसाठी भावांवर प्रेम करत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्हाबाबतही एक विधान केलं. त्यामुळे ते अजित पवार यांनाच उद्देषून असल्याचे म्हटलं जात आहे.
    
हे भाऊ- बहिणीच्या नात्याला १५०० रुपयांची किंमत लावतात - सुप्रिया सुळे

“राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा केला, आम्हाला मतदान झालं नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज टाकू. आताचं जे सरकार आहे ते तुमच्या आणि माझ्या सुख आणि दुःखाचं नाही. हे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला १५०० रुपयांची किंमत लावत आहात. बहि‍णींचं प्रेम कधीतरी बघा. ही बहीण फक्त १५०० रुपयांसाठी भावांवर प्रेम करत नाही, तर मनापासून प्रेम करते. भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. पक्ष आणि चिन्ह काय? सगळं देऊन टाकलं असतं”, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

“राज्यात सर्व सरकार सत्तेत आल्यानंतर चांगलं काम करतात. पण या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे, या योजनेचा टायमिंग पाहा. त्यांना कधीही बहीण लाडकी वाटली नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना बहीण लाडकी वाटायला लागली. त्यांना नाते आणि व्यवहार यातील फरक कळत नाही. व्यवहारात पैसे असतात. नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे घेत नाहीत आणि व्यवहारात प्रेम आणि नातं येत नाही. महाराष्ट्रातील महिला फार स्वाभिमानी आहेत. तुम्ही १५०० रुपये देत आहात तर तुमचे आभारी आहोत. पण जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला १५०० रुपये देऊन आम्ही नात्यात वाहवत जाऊ, तर हा गैरसमज आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title: Speaking at Shivswarajya Yatra Supriya Sule has made suggestive statement about Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.