सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. काल या बहुचर्चित स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला अन् पाकिस्तानला मोठा फायदा झाला. सामन्याचा निकाल न लागल्याने नियमानुसार दोन्हीही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. पाकिस्तानी संघाने ३ गुणांसह सुपर-४ मध्ये प्रवेश केला. तर, भारतीय संघाच्या खात्यात १ गुण आहे. सामन्यानंतर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूवर प्रेमाचा वर्षाव केला. एका पाकिस्तानी फॅनने भारतीय दिग्गज विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक करताना किंग कोहलीचे स्तुती केली. हा व्हिडीओ शेअर करत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किलपणे टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ शेअर करत म्हटले, "ही पाकिस्तानी मुलगी मनमोकळेपणाने विराटची स्तुती करतेय. आपल्याकडे कुणी बाबर आझमचं कौतुक केलं तर त्याची कबर खोदतील." एकूणच पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचे कुणी भारतीय चाहत्याने कौतुक केले असते तर त्याच्यावर भरमसाठ टीका झाली असती असे आव्हाड यांनी नमूद केले.
बहुचर्चित सामन्यात पावसाची बॅटिंग सुरूच होती. अनेकदा खेळाडूंना मैदानाबाहेर व्हावे लागले. पण भारताचा डाव झाल्यानंतर पाऊस न उघडल्याने सामना रद्द करण्यात आला. तत्पुर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच सावध खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीने सतावले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवून आपला इरादा स्पष्ट केला. त्यापाठोपाठ हारिस रौफने सलामीवीर शुबमन गिलला बाद केले. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. अखेर भारताला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् टीम इंडिया ४८.५ षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाली.
भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक (८७) धावा केल्या, तर इशान किशनने (८२) खेळी करून पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान उभे करण्यात मोलाचा हातभार लावला. किशन-पांड्याने पाचव्या बळीसाठी मोठी भागीदारी नोंदवून सामन्यात रंगत आणली. या दोघांना वगळता एकाही भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.