- अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (जि.बीड)महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता केवळ १५ ते २० हजारांवर बोळवण होऊ लागली आहे. बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक करणाऱ्या गाडीवानांना तर यंदा साधे बोलावणेही नाही.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. अंबाजोगाई व परिसरातून हजारो कामगार ऊसतोडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातही जातात. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई व चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत सहा महिने ऊसतोडीसाठी गेल्यास काहीतरी पोटापाण्याला मिळेल, या आशेवर हे कामगार होते.पण या कालावधीत मराठवाडा व परिसरात उसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, परिसरातील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता नाही. साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात बैलगाडीतूनच होते. बैलजोडीवर पोट असलेल्या कामगारांचेही हाल सुरू आहेत. अद्यापपर्यंत तरी या बैलगाडीवानांना कोणत्या साखर कारखान्याचा निरोप नाही. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवायची कशी, असा मोठा प्रश्न या कामगारांसमोर आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसह परराज्यातील साखर कारखाने मे महिन्यातच ऊसतोड कामगारांना प्रति कोयता एक ते दीड लाखाची उचल देतात. मात्र, दुष्काळाच्या झळा साखर कारखान्यांसह ऊसतोड कामगारांनाही सोसाव्या लागत आहेत. ज्या कारखान्यांकडून बोलावणे आले त्या कारखान्यांनी १५ ते २० हजार रुपयांवरच कामगारांची बोळवण केली. कमी पैशांमुळे कारखान्यांकडे जाण्याचे टाळले तर इथल्या दुष्काळी स्थितीत उपजीविका भागवायची कशी? ही समस्याही कामगारांना भेडसावणारी आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारही मिळेल ती उचल स्वीकारत आहेत.
केवळ वीस हजारांवर बोळवण
By admin | Published: August 15, 2015 1:11 AM