मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून सोशल मीडियात अजित पवारांविरोधात जाणीवपूर्वक टार्गेट करण्याची मोहिम काहींनी सुरू केली. त्याबाबत आता आम्ही सतर्क आहोत. लवकरच याबाबत योग्य कारवाई करू असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या ७-८ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगळा संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा केला, कुणीही आत्मविश्वास गमावला नाही. लवकरच आम्ही राज्याचा दौरा करणार आहोत. अधिवेशनानंतर अजित पवारही राज्यभरात फिरतात. सोशल मीडियावर जो अपप्रचार केला जात आहे त्याबाबत आम्ही सतर्क आहोत. अजितदादांना टार्गेट करण्याची विशेष मोहिम काहींकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. आमदारांची बैठकीत सगळे आमदार उपस्थित होते. केवळ नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच मी गेल्या ४० वर्षात अनेक निवडणुका जवळून पाहिल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात. येणाऱ्या विधानसभेतही वेगळी समीकरणे दिसतील. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. नेमकं निवडणुकीत काय काय घडलं, ज्याचा परिणाम निकालावर झाला, त्याचा आढावा घेतला जात आहे. लोकसभेत वेगवेगळे मतदान होते, विधानसभेत स्थानिक पातळीवर जनता विचार करत असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे असं तटकरेंनी म्हटलं.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या कारणामुळे आम्ही मागे पडलो, त्या त्रुटी भरून महायुतीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर विधानसभेला जाणार आहोत. यावेळी निवडणुकीचे निकाल काय लागतील याबाबत साशंकता सगळ्यांनाच होती. निवडणुकीचे अंदाज कुणाला नव्हते. मतदारांमध्ये काय विचार होते कळत नव्हते. प्रत्येक निवडणूक काही ना काही शिकवत असते तशी या निवडणुकीनं आम्हाला काय करायचे आणि काय नाही हे शिकवलं आहे असं तटकरे म्हणाले.
आम्ही जे बोलतो, त्यावर आव्हाडांनी शिक्कामोर्तब केलं
नगरला कार्यक्रम झाला, त्यात जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, ४ वेळा अजित पवारांना शरद पवारांनी वेडं बनवलं..हे त्यांच्या भाषणातील शब्द आहेत. जे आम्ही वर्षभर सांगत होतो, २०१४, २०१६, २०१९ आणि २०२२ असेल, राजीनामा दिला असेल त्या त्या वेळी भाजपासोबत जायचं हे ठरलेले होते. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. त्याबाबत आव्हाडांनी वेगळ्या भाषेत का होईना पण शिक्कामोर्तब केले. बोलण्याच्या ओघात सत्य बाहेर आलं असं सुनील तटकरेंनी सांगितले.
त्यासोबतच त्या कार्यक्रमात पक्षात खदखद किती हे या निमित्ताने बाहेर आले. जयंत पाटील ६ वर्ष प्रदेशाध्यक्ष आहेत. ४ महिने थांबा असं त्यांना व्यासपीठावर सांगावे लागले. सोशल मीडियावर काय बोलू नका. ज्या काही तक्रारी करायच्या त्या शरद पवारांकडे करा असं सांगावे लागते. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रीय अध्यक्षांसमोर या भावना बोलाव्या लागतात त्याचा अर्थ काय याचे विश्लेषण मला करण्याची आवश्यकता नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये. अनेकजण आमच्याही संपर्कात आहेत. परंतु आता महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली तर ती अजित पवारांच्या बाबतीत होईल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.