ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ : प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करुनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ त्यानुसार महाविद्यालयात मतदार नोंदणी अर्ज वाटणे, निवडणुकीसंदर्भात शाळांमध्ये स्पर्धा आणि प्रसिद्ध अभिनेत्यांमार्फत संदेश देण्याचा कार्यक्रम महापालिकेने आखला आहे़ महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मतदार यादी १ जानेवारी २०१७ नंतर जाहीर करण्याची शक्यता आहे़ त्यापूर्वी नवीन मतदार, मतदार यादीतून नाव गायब असलेले मतदार, स्थालांतरीत झालेले मतदार अशा सर्वांना आपले नाव मतदार यादीत २० डिसेंबरपर्यंत नोंदविता किंवा अद्ययावत करता येणार आहे़
यासाठी असलेल्या केंद्राची यादीच महापालिकेने जाहीर केली आहे़ ५० टक्केच मुंबईकर करतात मतदान एक कोटी २४ लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईत ६२ टक्के मतदार असणे अपेक्षित आहे़ मात्र प्रत्येक महापालिका निवडणुकीत मतदानाचा आकडा ५० टक्क्यांवरच अडकला आहे़ मतदारांची यादी अद्ययावत केली असता २०१२ नंतर एक कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदारांची संख्येत घट होऊन आजच्या घडीला ९१ लाख ८७ हजार २७८ मतदार उरले आहेत़ उपनगरांची लोकसंख्या वाढली शहर भागातील महागडी जीवनशैली परवडत नसल्याने बहुतांशी मुंबईकर उपनगरांकडे वळत असल्याचे यापूर्वीच उजेडात आले आहे़ मात्र आकडेवारीनुसार शहराच्या लोकसंख्येत तीन टक्के घट तर उपनगरांच्या लोकसंख्येत आठ टक्के वाढ झाले असल्याचे आता समोर आले आहे़
पुढच्या वर्षी सुजाण होणारेही मतदार १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मतदार होता येणार आहे़ यासाठी सप्टेंबरपासून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणी मोहीम सुरु होणार आहे़ तेव्हा या मतदारांना आपल्या वयाचा पुरावा देऊन वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायचा दोन महिन्याआधीच आपले नाव नोंदविता येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़ आरक्षण वाढणार सरासरी ५० ते ५५ हजार मतदारांचा एक वॉर्ड असतो़ प्रत्येक वॉर्डाची फेररचना होणार आहे़ अनुसूचित जाती व जमातीच्या व इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे आरक्षित वॉर्डांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़
तरीही वॉर्डांची संख्ये २२७ च राहणार आहे़ जनजागृतीसाठी अभिनेते मैदानात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे़ या मोहिमेला मराठी अभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले आणि स्वप्नील जोशी यांनी प्रतिसाद दिला आहे़ त्यानुसार मतदार नोंदणाचे संदेश देणाऱ्या पोस्टर्स व जाहितरातींमध्ये हे कलाकार झळकणार आहेत़ लोकसंख्येत चढउतार २०१२ मध्ये एक कोटी १९ लाख ७८ हजार ४५० लोकसंख्या होती़ यापैकी १ कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदार होते़ २०१७ मध्ये लोकसंख्येत वाढ होऊन एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ झाली आहे़ तर मतदार मात्र ९१ लाख ८७ हजार २७८ उरले आहेत़
मतदान केंद्र पहिल्यांदाच वाढणार २०१२ च्या पालिका निवडणुकीत ७६३९ मतदान केंद्रे होती़ मतदारांची घटणारी संख्ये पाहता दूरवरच्या मतदान केंद्रावर मतदार फिरकत नसल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एक कि़मी़हून कमी अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे़ त्यानुसार नऊ हजारांहून अधिक मतदान केंद्रे यावेळीस असणार आहेत़ मात्र एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा घालण्यात येणार आहे़
अशी होणार मतदारांची नोंदणी
टोल फ्री हेल्पलाईन १८००२२१९५० यावर मतदार नोंदणीविषयी माहिती उपलब्ध आहे़ तर www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी अर्ज व माहिती उपलब्ध आहे़ तसेच महाविद्यालयांमध्येही अर्ज वाटण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर नावात बदल, नावाचा समावेश, मृत मतदाराचे नाव वगळणे, स्थलांतर, नावात दुरुस्ती व नोंदणीसाठी उपनगरांमध्ये २६ केंद्र आहेत़ ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहील़ या सर्वांची माहिती संकेतस्थळावर आहे़