मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानने राज्यातील दुर्ग संवर्धनासाठी एप्रिल महिन्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात माथेरान येथील विकटगड (पेब किल्ला) येथून रविवारी करण्यात आली.विकटगड किल्ल्याचे गडपूजन करून मोहिमेला सुरुवात झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली. रघुवीर म्हणाले की, या मोहिमेत गडावरील मंदिरांसह पाण्याच्या टाकीतील प्लॅस्टिकचा कचरा काढून टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर, सायंकाळी ४ वाजल्यानंतर दुर्गदर्शन व किल्याच्या माहितीला उजाळा देण्यात आला. किल्यावर भगवा ध्वज फडकवून सामूहिक शिववंदनेने मोहिमेची सांगता झाली. दरम्यान, रविवारी पुण्यातील कोराई गड या ठिकाणीही दुर्गसंवर्धन मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.पुण्यातील संग्रामदुर्ग अर्थात, चाकण किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातत्व विभागाच्या परवानगी सलग १० दिवसांची संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. ४ एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत किल्ल्यावरील बुरूज, तटबंदी यांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे, शिवाय येथील टेहाळणीची जागेसह मंदिर परिसरात डागडुजीसह स्वच्छता केली जात आहे. किल्ल्यातून जाणारा रस्ता बंद करण्यासाठी प्रशासनासोबत पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिष्ठानचे प्रतीक जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>दुर्गप्रेमींना सामील होण्याचे आवाहनदुर्ग संवर्धनाची इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाला महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नि:शुल्क सामील होता येईल, अशी माहिती रघुवीर यांनी दिली. प्रत्येक किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या शास्त्रोक्त पद्धतीने साफ केल्या जातील. प्रत्येक मोहिमेत स्वच्छता मोहिमेनंतर दुर्ग भ्रमण करताना, किल्ल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देतील. ८ व ९ एप्रिल रोजी शहापूर येथील माहुली आणि अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यावर संवर्धन मोहीम राबवण्यात येणार आहे. १५ व १६ एप्रिल रोजी मुरबाड येथील सिद्धगड, पुण्यातील तिकोना आणि सांगली येथील बानूरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील. संपूर्ण मोहीम नि:शुल्क असून, प्रत्येक नागरिकाने स्व: खर्चाने मोहिमेच्या ठिकाणी पोहोचावे.
दुर्ग संवर्धनासाठी ‘सह्याद्री’ची विशेष मोहीम
By admin | Published: April 03, 2017 2:59 AM