- गौरीशंकर घाळे मुंबई : शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून वर्षातून एकदा शहरी भागातील संपूर्ण रस्त्याचे आॅडिट केले जाणार असून अपघातप्रवण क्षेत्रांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्षातून दोनदा तपासणी केली जाणार आहे.दिल्ली एकात्मिक वाहतूक व्यवस्थेकडून शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सूचना स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका आणि नगर परिषदेसाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. पालिका स्तरावरील समितीचे प्रमुख पद आयुक्तांकडे तर नगर परिषदांचे समिती प्रमुखपद संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. या समितीत वाहतूक पोलीस, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि स्थानिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेषत: अपघातप्रवण क्षेत्र सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागातील सूत्रांनी दिली. शहरी भागातील रस्ते अपघातांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने रस्ते अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेला दिले होते. उच्चाधिकार समितीच्या आदेशानंतर दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेने आपला अहवाल सादर केला. यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. संबंधित शहरी रस्त्यांच्या आॅडिटनंतर आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या पाठपुराव्याची जबाबदारी विशेष समितीवर असणार आहे.पहिल्या ५०मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकरस्ते अपघातांबाबत केंद्रीय वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक अपघातांच्या ५० शहरांच्या यादीत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. २०१७ साली मुंबईत एकूण ३१६० अपघात झाले. यात ४९० लोक दगावले तर ३२८७ जखमी झाले. तर पुण्यातील १५०८ अपघातांत ३७२ ठार तर ११५४ जण जखमी झाले. नागपुरातील १२४२ अपघातांत २३१ जणांना आपले प्राण गमावावे लागले तर १२५६ जण जखमी झाले. नाशिकमधील ६३१ अपघातात १७१ ठार तर ५१० जखमी झाले. एका वर्षाच्या कालावधीत या चार महानगरातील अपघातात एकूण १२६५ जण ठार झाले असून ६२०७ जण जखमी झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
शहरी रस्त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती; वर्षातून एकदा होणार आॅडिट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:22 AM