काशिनाथ वाघमारे/ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 18 - नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सोलापूर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाच-सहा टप्प्यांवर अर्थात ३० हेक्टरवर आठ उपयुक्त गवतांची लागवड करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे़ याचा पहिला टप्पा म्हणून ५ हेक्टरवर या गवतांची लागवड करून माळढोक वाढीच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे. नान्नज अभयारण्यातून पक्ष्यांनी पाठ फिरवली, त्यामागे अनेक कारणे आहेत़ त्यातील मुख्य कारण म्हणजे गवत आणि कीटकसंख्या़ पूर्वी या संपूर्ण क्षेत्रफळात बहुतांश उपयुक्त गवत होते़ कालांतराने उपयुक्त गवत कमी होत गेल्याने कीटकांची संख्या कमी होत गेली़ त्याचबरोबर काळवीट आणि ससे यांचीही संख्या रोडावत गेली़ खूप गांभीर्याने घेण्यासारखी ही बाब म्हणावी लागेल़ परिणामत: एकेकाळी शंभराच्या जवळपास माळढोक पक्ष्यांची संख्या होती, आता एक-दोनवर असल्याचा सर्वेक्षणातील अंदाज आहे़ निसर्गाच्या साखळीतील ही कडी सुस्थितीत ठेवण्यासाठी वनखात्याचे उपवन संरक्षक सुभाष बडवे यांनी कुरण व्यवस्थापनांतर्गत ह्यउपयुक्त गवतह्ण लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. उपयुक्त गवताच्या जाती़-* धामण* आंजन*डोंगरी*गिन्नी*पवन्या*दिनानाथ * युरोकोला * शेडाधारवाड, झाशीमधून मागवल्या बिया राष्ट्रीय चारा संशोधन केंद्र (धारवाड), झाशी (मध्यप्रदेश) येथून बियाणे मागवण्यात आले आहे़ सिद्धेश्वर वनविहाराच्या रोपवाटिकेत गवत रोपे तयार केली आहेत़ मागील २ वर्षांपासून या गवताची रोपे तयार करण्याचे काम सुरु आहे़ सध्या जवळपास ५ हजार रोपे लावण्यात आली आहेत़
गवताची वैशिष्ट्ये* या गवतावर अनेक कीटकांची पैदास होते़ त्यामुळे अनेक पक्ष्यांना सहजरित्या खाद्य उपलब्ध होते़ * गिन्नी नावाचे गवत दिवसभरात ४ इंचाने वाढते़ त्याची उंची ४-५ फूट वाढते़ याच्या बिया अनेक पक्षी खाद्य म्हणून खातात़ * काळवीट, ससे यांचे हे गवत मुख्य खाद्य आहे़ त्यामुळे त्यांची संख्यादेखील वाढवण्यास मदत होणार आहे़ * माळढोकचे मुख्य खाद्य टोळ-कीटकांचीही संख्या या गवतामुळे वाढणार आहे़
या विशेष गवतातून माळढोक पक्ष्यांसाठी खाद्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार आहे़ हे गवत जवळपास ५ फूट वाढणार आहे़ या गवतावर कीटक वाढतील आणि या कीटकांचा माळढोक पक्ष्यांना खाद्य म्हणून उपयोग होणार आहे़ याबरोबरच वाढलेल्या गवतात लपण्यासाठी मदत होणार आहे.